महाराष्ट्रातील पहिल्याच प्रदर्शनाचे इस्लामपूर येथे आयोजन
इस्लामपूर- देश-विदेशात सुप्रसिद्ध असणारे थ्रीडी आर्ट स्टुडिओ प्रमाणे महाराष्ट्रात प्रथमच थ्रीडी पोस्टर प्रदर्शन इस्लामपुरात सुरू आहे. एक जगप्रसिद्ध व वेगळी संकल्पना साकारून भरविण्यात आलेले हे प्रदर्शन सर्वसामान्य कलारसिकांना पर्वणीच ठरत आहे.
युवा चित्रकार गणेश पोतदार व कला शिक्षक संतोष ढेरे यांनी ही चित्रे कॅनव्हासवर रेखाटली आहेत. या चित्रांसोबत मोबाइलवर छबी टिपण्यासाठी अबालवृद्धांची गर्दी होत आहे. जरा हटके फोटो घेत ते सोशल मीडियावर व्हायरलही केले जात आहेत. येथील संभु-आप्पा उरुसाच्यानिमित्ताने येथील उरण परिसरातील अंबाबाई मंदिरात हे आर्टव्हिला पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले आहे. 23 नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी पाहण्यासाठी खुले आहे.
कलारसिकांना अनोखी संधी
थ्री डी आर्ट पोस्टर स्टुडिओ मोठ्या शहरात असतात. मोठी रक्कम खर्च करून ते रसिकांना पहावे लागतात. पण प्रदर्शनाच्यानिमित्ताने सर्वच जिल्ह्यातील रसिकांना ही संधी मिळाली आहे. तसेच तुम्ही स्वतः त्या चित्रात सहभागी होऊन फोटोग्राफ घेऊ शकता. सध्याच्या अँड्रॉइड मोबाइल जमान्याची असणारी आवड लक्षात घेऊन ही चित्र संकल्पना साकारलेली आहे.