नवी दिल्ली – अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत यश संपादन करणाऱ्या मान्यवरांच्या यशोगाथा आपण वाचतच असतो. अनेकांनी कठीण परिस्थितही आपले ध्येय गाठले आहे. ध्येयाचा पाठलाग करताना सातत्याची कास धरली आहे. देशात असंख्य विद्यार्थी स्पर्धा परिक्षेची तयारी करीत आहेत. अशांसमोर प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजेच जी. गोपीनाथ होय.
जी. गोपीनाथ यांचे वडील गेल्या कित्येक वर्षांपासून रिक्षा चालवतात. रिक्षा चालून येणाऱ्या पैशातून त्यांनी त्यांच्या कुटूंबियांची जबाबदारी आणि मुलांचे शिक्षण पूर्ण केले. गोपीनाथ यांच्या वडिलांना ते इंजिनिअर व्हावे असं वाटत होतं. पण त्यांच्या आजोबांना त्यांनी सैन्यात जावं असं वाटत होत. कारण ते भारतीय सैन्यात कार्यरत होते. म्हणून त्यांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जी. गोपीनाथ यांनी सर्वप्रथम एअरफोर्समध्ये एअरमॅन म्हणून काम केले नंतर फ्लाईंग ऑफिसर होण्यासाठी मेहनत देखील घेतली.
या प्रवासाबाबत जी. गोपीनाथ सांगतात, ‘माझ्या शिक्षणासाठी आईवडिलांनी अनेक अडचणींचा सामना केला त्यामुळे मी शिकलो” असं गोपीनाथ यांनी म्हटलं आहे. ते सर्वप्रथम एअरफोर्समध्ये एअरमॅन म्हणून कार्यरत होते. मात्र त्यांचं स्वप्न हे फ्लाईंग ऑफिसर होणं हे होतं. ते त्यासाठी खूप अभ्यास करत होते. काम करत असताना त्यांनी या पदासाठी खूप मेहनत देखील घेतली. आवश्यक असणारी तयारी केली आणि आपलं फ्लाईंग ऑफिसर होण्याचं स्वप्न देखील पूर्ण केलं आहे.’