मांडवगण फराटा – तांदळी (ता. शिरूर) येथील शेतकऱ्याने निर्यातक्षम ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन घेतले असून मुंबई, पुणे आदी बाजारपेठेत या फळांना मोठी मागणी आहे. भीमा व घोडनदीच्या ऊस पट्ट्यात तांदळीतील शेतकरी सुरेश रोहिदास गदादे यांनी ड्रॅगन फ्रूट शेतीचा अनोखा प्रयोग राबविला अन् तो यशस्वी ही करून दाखविला आहे. दोन एकरांत 12 लाख 50 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे.
सुरेश गदादे यांनी 2017 मध्ये दोन एकर क्षेत्रात रेड व्हाईट जातीच्या ड्रॅगन फ्रूटची लागवड केली होती. यासाठी लोणी व्यंकनाथ येथून रोपे आणली. पूर्व मशागत करताना नांगरट करून एकरी 5 ट्रेलर शेणखत टाकले. बेडमध्ये दोन टप्प्यात लागवड केली. खत निर्मिती व उन्हापासून संरक्षण करण्यासाठी तागाची पेरणी केली.
लागवडीनंतर कमीत रासायनिक खतांचा वापर केला. ठिबक सिंचनमधून विद्राव्य खते सोडली. त्यासाठी माळरान व निचरा होणारी जमीन त्यांनी निवडली. 7 फूट लांब व 12 फूट रुंद अशा पद्धतीने नियोजन केले. 25 रुपयांप्रमाणे ड्रॅगन फ्रूट रोपांची खरेदी केली. रेड व्हाईट जातीची निवड केली. लोणी व्यंकनाथ येथून रोपाची खरेदी केली. सिमेंट खांबाचा वापर करीत प्रत्येक खांबाला 4 रोपांप्रमाणे लागवड केली.
एक वर्षानंतर लोखंडी ब्रॅकेट बनवून त्यावर मोटरसायकल टायरचा वापर केला. एकरी 5 ट्रेलरप्रमाणे शेणखत वापरले. फवारणीची गरज नाही. उन्हाळ्यात पंधरा दिवसाला पाणी लागते. आतापर्यंत एकरी साडेतीन लाख रुपये खर्च आल्याचे गदादे यांनी सांगितले. एक वर्षात उत्पादन सुरू झाले; मात्र दुसऱ्यावर्षी चांगले उत्पन्न मिळते. साधारण पाच महिने तोडणी सुरू असते. बागेसाठी बोअरवेलच्या पाण्याचा गदादे वापर करतात. एका झाडाला साधारण 20 किलो फळ निघत आहे. चौथ्या बाजारातून त्यांना दोन एकरात आतापर्यंत 12 लाख 50 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. 20 टन इतके उत्पादन व 15 लाख उत्पन्न मिळेल, अशी गदादे यांना आशा आहे.
कुटुंबाची मोलाची साथ
यावर्षी सुरेश गदादे यांनी पुन्हा नव्याने अर्धा एकर क्षेत्रात जंबो रेड, जंबो इलो या जातीची लागवड केली आहे. गदादे यांनी उत्पादन घेण्याबरोबरच ड्रॅगन फ्रुटसची विक्री स्वत:च्या कृष्णाई ड्रॅगन फ्रूट फार्म या नावाने केली आहे. यात त्यांना पत्नी स्मिता व वडील रामदास गदादे हे मदत करतात.