पटना – बिहार लोकसेवा आयोगाच्या 64 व्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. या परीक्षेमध्ये पटना येथील ओम प्रकाश गुप्ता यांनी घवघवीत यश संपादित करत पहिला क्रमांक पटकावला.
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सरकारी शाळेमधून पूर्ण करणाऱ्या ओम यांनी यापूर्वी आयआयटीची अत्यंत क्लिष्ट मानली जाणारी प्रवेश परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पार केली होती. यानंतर त्यांनी पाच वर्ष अध्यापनाचे कार्य केले.
2017 मध्ये त्यांनी बिहार लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी शिक्षकाची नोकरी सोडून स्वतःला पूर्णवेळ अभ्यासात झोकून दिले. या मेहनतीचे फळ आता त्यांना मिळाले असून त्यांनी या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
अत्यंत सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या ओम यांचे वडील किराणा मालाचे दुकान चालवतात. आपल्या मुलाची अधिकारी म्हणून झालेली निवड त्यांच्या कुटुंबियांसाठी अत्यंत सुखदायक ठरली आहे. ओम यांना देखील आपण या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवू असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. मात्र चिकाटी व सातत्यपूर्ण मेहनतीमुळे ओम यांचे सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
सरकारी अधिकारी म्हणून काम करताना ओम यांना बिहार मधील बेरोजगारीचा ज्वलंत प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा आहे असं ते सांगतात.