उदयनराजेंकडून सभास्थळाची पाहणी; नेत्यांच्या गाठीभेटी

कराड  – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या रविवारी (दि. 24) येथील दत्त चौकात होणाऱ्या सभास्थळाची खा. उदयनराजे भोसले यांनी बुधवारी दुपारी पाहणी केली. तसेच तालुक्‍यातील मान्यवरांच्या निवासस्थानी जाऊन गाठीभेटी घेतल्या. सलग तिसऱ्यांदा राष्ट्रवादीची उमेदवारी मिळालेल्या उदयनराजेंनी कराड तालुका पिंजून काढायला सुरुवात केली आहे. दरम्यान, युवा वर्गात उदयनराजेंची जबरदस्त क्रेझ असून प्रत्येक ठिकाणी त्याचे दर्शन घडत आहे.

सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ रविवारी शरद पवार यांची सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी सुरु आहे. सभास्थळाच्या पाहणीसाठी बुधवारी दुपारी खा. उदयनराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. आनंदराव पाटील, जि. प. चे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर यांच्यासह उदयनराजे मित्र समूहाचे राजेंद्रसिंह यादव, विजयसिंह यादव, संग्राम बर्गे, नगरसेवक हणमंतराव पवार, अतुल शिंदे, राजेंद्र उर्फ आप्पा माने, ऍड. आनंदराव पाटील, माजी नगरसेवक अशोकराव पाटील उपस्थित होते.

सभा मंच आणि लोकांची बसण्याची सोय, याची माहिती घेतल्यानंतर सर्वजण नजीकच्या हॉटेल गजाननमध्ये गेले. त्याठिकाणी आ. बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे यांनी मिसळचा आस्वाद घेतला. उदयनराजे फक्‍त मान्यवरांसमवेत बसले होते. नाष्टा झाल्यानंतर उदयनराजेंनी कार्यकर्त्यांसमवेत सैदापूर-विद्यानगरमध्ये दलित महासंघाचे संस्थापक प्रा. मच्छिंद्र सकटे यांच्या निवासस्थानी जाऊन प्रा. सकटे यांची भेट घेतली.

तेथून ते रेठरे बुद्रुकला गेले. तेथे कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. इंद्रजीत मोहिते आणि अविनाश मोहिते यांच्या निवासस्थानी त्यांनी भेटी दिल्या. अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांच्या कार्वे नाका येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी उदयनराजेंनी चर्चा केली. दरम्यान, खा. उदयनराजे ज्या-ज्या ठिकाणी गेले, त्या-त्या ठिकाणी युवकांनी त्यांना गराडा घातला. यातून उदयनराजेंची युवा वर्गात असलेली क्रेझ पहायला मिळाली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)