पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने “ईव्हीएम’ अर्थात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची प्राथमिक तपासणी करण्याचे काम हाती घेतले आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत.
यामध्ये बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट अशा एकूण 49 हजार 328 मशीन्सची तपासणी करण्यात येत आहे.
राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 21 मतदारसंघ आहेत.
निवडणुकीसाठी महत्त्वाचे असलेले “ईव्हीएम’ केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहे. जिल्ह्यात सुमारे 8 हजार 417 मतदान केंद्र आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यासाठी बॅलेट युनिट 19 हजार 107, कंट्रोल युनिट 10 हजार 690 आणि व्हीव्हीपॅट 19 हजार 531 मशीन्स प्राप्त झाल्या आहे. कोरेगाव पार्क येथील खाद्य गोदामामध्ये या मशीनची प्राथमिक तपासणीचे काम मागील तीन-चार दिवसांपासून सुरू आहे.
प्राथमिक तपासणीमध्ये मशीन वापरण्यायोग्य आहे का? याची तपासणी केली जात आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मशीनची फस्ट लेव्हल तपासणी केली जात आहे. संबंधित कंपनीच्या अभियंत्यांकडून ही तपासणी करण्यात येते.
उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या देखरेखीखाली तपासणी सुरू असून तलाठी, मंडल अधिकारी, महसूल विभागातील कारकून हे तपासणीचे काम करत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.