– श्रीनिवास वारुंजीकर
भारताने वर्ष 1977-78 च्या दौऱ्यात कांगारुंच्या भूमीत एकाच मालिकेत दोन कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला.
ब्रिस्बेन – 2 ते 6 डिसेंबर 1977
मालिकेतला पहिलाच सामना चुरशीचा झाला. बिशनसिंग बेदीच्या 55 धावातल्या 5 आणि चंद्रशेखर व मोहिंदर अमरनाथच्या प्रत्येकी 2 विकेट्सपुढे ऑस्ट्रेलियन संघाला फक्त 166 धावा करता आल्या. त्यात पिटर टुहीच्या 82 धावा होत्या. भारताने मात्र पहिल्या डावात या गोलंदाजांच्या कामगिरीला न्याय दिला नाही. दिलीप वेंगसरकर (48) आणि गुंडप्पा विश्वनाथ (45) यांच्या जोरावर भारताला फक्त 153 इतकी मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाच्या वायने क्लार्कने 46 धावांत 4, जेफ थॉम्सन आणि टोनी मान यांच्या प्रत्येकी 3 विकेट्सने भारताला आघाडी मिळवता आली नाही. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 327 धावा केल्या; ज्यात बॉब सिम्पसनच्या 89 तर पिटर टुहीच्या 57 धावा उल्लेखनीय ठरल्या. भारताकडून मदनलालने 75 धावांत 5 विकेट्स घेतल्या. भारताला 340 धावांचे आव्हान गाठायला 16 धावा कमी पडल्या. सुनिल गावसकरचे शतक (113), यष्टीरक्षक किरमाणीच्या 55 तर अमरनाथच्या 44 धावांबरोबरच बेदीने 26 धावा करत सामन्यांतले आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाकडून थॉम्सन आणि क्लार्कने प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या.
पर्थ – 16 ते 21 डिसेंबर 1977
या सामन्यात भारताने प्रथम ऑस्ट्रेलियात 400 धावांचा टप्पा पार केला. मोहिंदर अमरनाथच्या 90, चेतन चौहानच्या 88 धावांइतकेच मोल वेंगसरकरच्या 49 धावांना होते. शिवाय सय्यद किरमाणी (38), श्रीनिवासन वेंकटराघवन (37) आणि मदनलालच्या 43 धावांमुळे भारताने 402 धावा केल्या. थॉम्सनच्या 4 आणि सॅम गॅननच्या 3 विकेट्स महत्त्वपूर्ण ठरल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 394 धावा करताना कर्णधार बॉब सिम्पसनच्या 176 आणि स्टीव्ह रिक्सनच्या 50 धावाच लक्षणीय ठरल्या. पुन्हा एकदा बिशनसिंग बेदीच्या 89 धावांत 5 विकेट्स चर्चेचा विषय झाल्या. भारताने दुसरा डाव 9 बाद 370 धावांवर घोषित केला. ज्यात सुनिल गावसकर आणि गुंडाप्पा विश्वनाथ यांची शतके (अनुक्रमे 127 आणि 100) याचा मोठा वाटा राहिला. विजयासाठी 338 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने 8 गड्यांच्या मोबदल्यात गाठले. टोनी मानच्या 105 आणि पिटर टुहीच्या 83 धावांमुळे हे शक्य झाले. भारताकडून बेदीनेच पुन्हा 105 धावांत 5 विकेट्स घेत नवा विक्रम केला.
मेलबर्न – 30 डिसेंबर 1977 ते 4 जानेवारी 1978
गावसकर आणि चौहान हे दोन्ही सलामीवीर शून्यावर परतल्यानंतर भारताने अमरनाथ (72), विश्वनाथ (59) आणि अशोक मांकडच्या 44 धावांसह 256 धावा केल्या. थॉम्सनने 4 विकेट्स घेतल्या. क्रेग सार्जंटच्या 85 आणि गॅरी कोझीएच्या 67 धावांच्या बळावर यजमानांना 213 धावाच करता आल्या. चंद्रशेखरने 52 धावांत 6 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला नामोहरम केले. भारताने दुसऱ्या डावात सुनील गावसकरचे शतक (118), विश्वनाथ (54) आणि अमरनाथच्या 44 धावांसह 343 धावा केल्या. वायने क्लार्नने 4 विकेट्स घेतल्या. विजयासाठी 386 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला पेलवले नाही. त्यांचा संपूर्ण संघ 164 धावांत गारद झाला आणि भारताने 222 धावांनी मोठा विजय मिळवला. चंद्रशेखरच्या 6 आणि बेदीच्या 4 विकेट्सपुढे ऑस्ट्रेलियन फलंदाजी साफ ढेपाळली.
सिडनी – 7 ते 12 जानेवारी 1978
विदेशी भूमीवर भारताला सलग दुसरा कसोटी विजय मिळवून दिलेला हा सामना भारतासाठी आजही महत्त्वाचा मानला जातो. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे सात फलंदाज एकेरी धावसंख्येत बाद झाले, ज्यातले दोघे भोपळाही फोडू शकले नाहीत. कर्णधार बॉब सिम्पसनच्या 38 आणि जॉन डायसनच्या 26 धावाच उल्लेखनीय ठरल्या. बेदी आणि चंद्रशेखर यांनी अनुक्रमे 4 आणि 3 विकेट्स घेतल्या तर प्रसन्नाला एक विकेट मिळाली. भारताने सावधगिरीने फलंदाजी करत 8 बाद 396 वर आपला डाव घोषित केला. त्यामध्ये विश्वनाथ (79), करसन घावरी (64), गावसकर (49), वेंगसरकर (48) आणि चेतन चौहान (42) यांच्यासह प्रसन्नाच्या नाबाद 25 धावाही बहुमोल होत्या. नेहमीप्रमाणे थॉम्सनने 4 विकेट्स घेत वर्चस्व गाजवले. भारताकडे 265 धावांची आघाडी होती. मात्र, प्रसन्ना (4 विकेट्स) आणि चंद्रशेखर व बेदींच्या प्रत्येकी 2 विकेट्सच्या बळावर फिरकीपुढे लोटांगण घालत ऑस्ट्रेलियाचा डाव 263 धावांत संपला. त्यामुळे भारताने हा सामना एक डाव आणि 2 धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून पिटर टुहीच्या 85 आणि ग्लेन कोझिएच्या 62 धावाच लक्षणीय ठरल्या. मालिका 2-2 बरोबरीत आली.
ऍडिलेड – 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 1978
मालिकेत बरोबरी झाल्यानंतर उत्साह दुणावलेल्या भारताने अखेरची कसोटी जिंकण्याची तयारी केली होती. मात्र बॉब सिम्पसन (100) आणि ग्रॅहम यलॉप (121) या दोघांची शतके आणि वार्विक अर्थात रिक डार्लिंगच्या 65 धावांमुळे ऑस्ट्रेलियाने 505 धावांचा डोंगर उभा केला. चंद्रशेखरने 5 तर घावरीने 3 विकेट्स घेतल्या. मात्र, भारताचा डाव 269 धावांत संपला. त्यात विश्वनाथच्या 89, किरमाणीच्या 48 आणि वेंगसरकरच्या 44 धावा होत्या. वायने क्लार्कच्या 4 आणि इयान कॅलनच्या 3 विकेट्स लक्षणीय होत्या. पुन्हा ऑस्ट्रेलियाने खेळताना 256 धावा केल्या. त्यात डार्लिंगच्या 56 आणि सिम्पसनच्या 51 धावा सर्वाधिक होत्या. इथे मात्र घावरी आणि बेदीने प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. भारताला हा सामना जिंकायला 47 धावा कमी पडल्या. तरीही चौथ्या डावात खेळताना 400+ धावा भारताने केल्या. त्यामध्ये अमरनाथ 86, वेंगसरकर 78, विश्वनाथ 73 आणि किरमाणीच्या 51 अशी चार अर्धशतके होती. भारताने सर्वबाद 445 धावा करत एक नवा विक्रम केला. ब्रुस यार्डलेच्या 4 व इयान कॅलनच्या 3 विकेट्सनी भारताला विजयापासून दूर नेले. मालिका ऑस्ट्रेलियाने 3-2 अशी जिंकली.