ऍमेझॉन प्राइमवर गाजलेल्या सीरिजमध्ये “इनसाईड एज’ ही एक गाजलेली सीरिज आहे. क्रिकेटच्या विषयावरील या सीरिजमध्ये “आयपीएल’मधील मॅच फिक्सिंगच्या विषयाचा तडका होता.
त्यामुळे प्रेक्षकांना खेचून घेतले होते. दुसऱ्या सीरिजमध्येही क्रिकेटमधील डोपिंगच्या विषयावरील मालमसाला भरला होता. त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
अखेरच्या एपिसोडमुळे पुढच्या सीजनमध्ये काय असेल, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. आता तिसऱ्या सीजनचे बहुतेक शूटिंग झाले आहे. मात्र, त्याबद्दल थोडीशी निराशा झाली आहे.
विशेषतः “द फॅमिली मॅन 2’चे यश बघता या सीरिजकडून जेवढ्या अपेक्षा केल्या जात होत्या, त्या काही पूर्ण होत नसल्याची प्रतिक्रिया आहे. त्यामुळे ही सीरिज जशी आहे तशी रिलीज करायला ऍमेझॉन प्राइमने नकार दिला आहे.
या तिसऱ्या सीरिजमध्ये भारत-पाकिस्तान दरम्यानच्या क्रिकेट पॉलिटिक्सचा विषय असणार आहे. विवेक ओबेरॉय हा भारतीय क्रिकेट संघाच्या वाईटावर टपलेला पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचा अधिकारी असणार आहे.
मात्र, हा वाद खूपच खालच्या पातळीवरचा वाटल्याने त्याचे शूटिंग गेल्या वर्षी थांबवण्यात आले होते. आता जेवढे शूटिंग झाले आहे, तेवढे नव्याने करण्याची वेळ आली आहे.