मुठा नदीच्या स्वातंत्र्यावरच घाला

अतिक्रमणांमुळे नदीची वहनक्षमता घटली
आता 27 हजार क्‍युसेकलाच पूरस्थिती
दरवर्षीच पूरस्थिती उद्‌भवण्याचा धोका

पुणे –  तब्बल 1 लाख क्‍युसेक वहनाची क्षमता असलेल्या मुठा नदीपात्राचा राजरोसपणे होत असलेल्या अतिक्रमणांमुळे गळा घोटला जात असल्याचे समोर आले आहे. 2011 मध्ये खडकवासला धरणातून 65 हजार क्‍युसेकपेक्षा अधिक पाणी सोडल्यानंतर पूरस्थिती उद्‌भवली होती.

मात्र, अवघ्या 8 वर्षांतच आता 27 हजार क्‍युसेक विसर्ग करताच शहरात पूरस्थिती उद्‌भवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नदीपात्रात होणारी अतिक्रमणे वेळीच न रोखल्यास भविष्यात शहराला दरवर्षीच पुराचा सामना करावा लागण्याचा धोका आहे.

नदीची जबाबदारी कोणाची?
मुठा नदीची मालकी ही पाटबंधारे विभागाकडे आहे. मात्र, त्याचवेळी शहरातील नदीपात्रात पूररेषेत होणारी अतिक्रमणे अथवा राडारोडा टाकून पाण्यास निर्माण केला जाणारा अडथळा ही जबाबदारी महापालिकेची असल्याचे सांगत पाटबंधारे विभाग कानाडोळा करत आहे. तर, “मालकी पाटबंधारे विभागाची असल्याने आम्ही त्यांना हवी ती मदत देऊ मात्र, हे प्रकार त्यांनीच थांबवावेत’ अशी भूमिका महापालिका घेते. त्यामुळे मुठा नदीची जबाबदारी कोणाची याचा अर्थ हे दोन्ही विभाग सोयीस्कररीत्या घेत असल्याने नदीपात्रात होणारे अतिक्रमण हा कळीचा विषय बनला आहे.

दशकभरात वहनक्षमतेत घट
दोन दशकांपूर्वी याच नदीची क्षमता 1 लाख क्‍युसेकपर्यंत होती. गेल्या दशकभरात ती 65 ते 80 हजारांवर आली आहे. तर आता ती थेट 25 ते 35 हजारांवर येऊन पोहोचली आहे. हे आकडे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि पूरनियंत्रणासाठी दरवर्षी केल्या जाणाऱ्या आराखड्यातील आहेत. त्यामुळे नदीचे पात्र संकुचित होताना कोणी जबाबदारी घेणार की नाही, असा प्रश्‍न आहे. तर न्यायालयानेही अनेकदा नदीतील अतिक्रमणांवरून या दोन्ही यंत्रणांची कान उघडणी केली आहे. मात्र, तरीही हे दोन्ही विभाग आपल्या जबाबदाऱ्या स्वीकरण्यास तयार नाहीत.

अतिक्रमणांना पालिकेचाही हातभार
महापालिकेने नदीची जबाबदारी झटकली असली तरी नदीकाठावर निळी आणि लाल पूररेषेंमधे बांधकामास परवानगी न देणे हे तरी महापालिकेच्या हातात आहे. पण गेल्या काही वर्षांत पूररेषा निश्‍चित नसल्याचा फायदा घेत महापालिकेनेही नदी परिसरात बेसुमार बांधकामांना परवानगी दिली. या अनधिकृत बांधकामांना नोटीस देण्याची तसदी पालिका घेत नाही. दुसऱ्या बाजूला नदीत राडारोडा टाकण्यास मज्जाव करणारी महापालिकेचीच यंत्रणा रातोरात विकासकामांचा राडारोडा नदीत आणून टाकते. त्यामुळे याला पालिकेचाही हातभार असल्याचे चित्र आहे.

पालिकेचा अजब दावा
पूर नियंत्रणासाठी आराखडा केला जातो. त्यानुसार, 55 हजार क्‍युसेक विसर्गानंतर वडगाव बुद्रुक, हिंगणे परिसरात पूर येतो. मात्र, यंदा हे प्रमाण 27 हजार असताना घरांत पाणी शिरले. तर 49 हजार क्‍युसेक विसर्गावेळी पंधरावर सोसायट्यांत पाणी घुसले. 60 हजार क्‍युसेकला पाटील इस्टेट झोपडपट्टीत पाणी घुसते. मात्र, यंदा 49 हजार क्‍युसेकलाच या भागासह डेक्कन भागातही पाणी घुसले. याचा सरळ अर्थ नदीपात्राची वहन क्षमता घटली असा आहे. तर, शहरात 55 हजार क्‍युसेकनंतरच पूर येतो, असा अजब दावा प्रशासन अजूनही अहवालात करत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)