कॅलिनिनग्राड (रशिया) : आयएनएस तुशील ही अत्याधुनिक बहु उद्देशीय मार्गदर्शित क्षेपणास्त्र युद्धनौका आज रशियाच्या कॅलिनिनग्राड येथील यंतर शिपयार्डमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलात सामील करण्यात आली. या युद्धनौकेचे नौदलात सामील होणे हे भारताच्या वाढत्या सागरी सामर्थ्याचा गौरवास्पद दाखला असल्याचे संरक्षण मंत्री आपल्या भाषणात म्हणाले.
आत्मनिर्भर भारत या भारताच्या संकल्पनेला रशियाने दिलेला पाठिंबा हे भारत आणि रशिया यांच्यातील गाढ मैत्रीचे आणखी एक महत्त्वाचे उदाहरण आहे. आयएनएस तुशीलसह अनेक जहाजांमध्ये भारतात तयार झालेली सामुग्री आहे. भारतीय नौदल प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून आपल्या क्षेत्रातील मित्रांना जलद आणि वेळेवर मानवतावादी मदत पुरवण्यासाठी तसेच आपत्ती निवारणासाठी नेहमीच तयार असते, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
भारत आणि रशिया आगामी काळात नवीन ऊर्जा आणि उत्साहाने आपल्या सहकार्याची पूर्ण क्षमता ओळखतील, असा विश्वास संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केला. दोन्ही देश केवळ विद्यमान सहकार्याच्या क्षेत्रांनाच बळकट करणार नाहीत, तर नवीन आणि आजवर सहकार्य केले नाही अशा क्षेत्रातही काम करण्यास प्राधान्य देतील यावर त्यांनी भर दिला.