विशाखापट्टणम, दि. 22 – संपूर्ण भारतीय बनावटीची पाणबुडीविरोधी विनाशिका “आयएनएस-कवरट्टी’ आज लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये दाखल करण्यात आली. कमोर्टा श्रेणीतील पाणबुडी विरोधी विनाशिका (एएसडब्लू) चार विनाशिकांच्या शृंखलेतील “आयएनएस- कवरट्टी’ही अखेरची विनाशिका आहे. नौदलाची शाखा असलेल्या “डायरेक्टोरेट ऑफ नेव्हल डिजाईन’च्यावतीने या विनाशिकेची संरचना करण्यात आली आहे आणि कोलकाताच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्संने त्याची बांधणी केली आहे.
कवरट्टीकडे अत्याधुनिक शस्त्रे आणि सेन्सर विभाग असून पाणबुडी शोधून त्यावर कारवाई करण्यास सक्षम आहे. पाणबुडीविरोधी युद्धनौकेच्या क्षमतेव्यतिरिक्त, या विनाशिकेत एक विश्वासार्ह स्वसंरक्षण क्षमता आणि लांब पल्ल्याच्या तैनातीसाठी चांगली चिकाटी देखील आहे.
कवरट्टीचे नाव तत्कालीन “आयएनएस कवराटी’ वरून घेतले आहे. ही युद्धनौका अर्नाळा श्रेणीतील क्षेपणास्त्र जहाज होते आणि 1971 मध्ये बांगलादेश मुक्तीच्या समर्थनार्थ कामगिरी बजावली होती.
या विनाशिकेवर बसवण्यात आलेल्या सर्व यंत्रणांच्या सागरी चाचण्या पूर्ण करण्यात आलेल्या असल्याने ही विनाशिका आता प्रत्यक्ष युद्धमोहिमेवर तैनात होण्यास सज्ज झाली आहे.