रोम – करोनाच्या संसर्गाकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपावरून इटलीचे पंतप्रधान ज्यूसेप कोंटे यांची तीन तास चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत ज्यूसेप कोंटे यांनी सर्व आरोपांचे खंडन केले आहे. तसेच जिथे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे, तिथे विरोधी पक्षाचे सरकार असल्याचे त्यांनी सांगितले.
करोना विषाणूच्या संक्रमणामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबियांनी सरकारविरूद्ध करोना महामारीवर दुर्लक्ष केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पंतप्रधान ज्यूसेप कोंटे यांच्यासह गृहमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांची शुक्रवारी सरकारी वकिलांनी चौकशी केली. ही चौकशी तब्बल तीन तास सुरू होती. या चौकशीत लॉकडाऊनच्या धोरणाबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. सरकारच्या दुर्लक्षामुळे करोना पसरला आणि करोनाचे हॉटस्पॉट्स सरकारने वेळीच सील केले नाहीत, असाही आरोप स्थानिकांनी केला आहे.
दरम्यान, यूरोपमध्ये करोनाचा संसर्ग प्रथम लोम्बार्डीमधूनच पसरला होता. तर बरगॅमो शहरात करोनामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मार्चमध्ये इटलीमध्ये लॉकडाऊन करण्यात आला. याच शहरातील नोइ डेनुन्सेरेमो नावाच्या गटाने तब्बल पन्नास तक्रारी इटालीच्या प्रशासनाविरोधात दाखल केल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे.