डॉ.सुभाष चव्हाण यांची माहिती, यादी जाहीर करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
सातारा (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन नेमकी कुठल्या रुग्णांना दिली गेली याबाबत जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक वेळा विचारूनही माहिती दिली जात नाही, अशी तक्रार झाल्यानंतर या प्रकाराची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे दिली होती. ही इंजेक्शन गरिबांना द्यावीत असे सूचित करण्यात आले होते. मात्र, अनेक इंजेक्शन रुग्णालयातून परस्पर लंपास करून चढ्या किमतीने बाहेर विकली गेल्याची तक्रार होत आहे.
खा. शरद पवार यांनी ही इंजेक्शन गरिबांसाठी दिली होती. मात्र, या जीवनदायी इंजेक्शनचा गैरवापर झाल्याचा संशय आहे. कोविड वॉर्डमधून या इंजेक्शनची चोरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी 175 इंजेक्शनचे रेकॉर्ड जाहीर करावे आणि रेकॉर्डमध्ये दोषी सापडतील त्यांच्यावर कारवाई करावी,अशी मागणी होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत होती. या इंजेक्शनबाबत असलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती डॉ.सुभाष चव्हाण यांनी रविवारी दिली.
दोषींवर कडक कारवाई करा-सुनील माने
शरद पवार यांनी दिलेली ही इंजेक्शन नेमकी कोणाला दिली याची सविस्तर माहिती मागूनही दिली जात नाही. त्यामुळे यामध्ये काही तरी गैरप्रकार झाला असल्याची संशय आहे. या प्रकाराची चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केली आहे.