वॉशिंग्टन – अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांचे पुत्र हंटर यांची आज करचुकवेगिरीप्रकरणी प्रांतिय तपास विभागाकडून चौकशी केली गेली. या चौकशीदरम्यान ज्यो बायडेन यांच्या प्रचारादरम्यान करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. स्वतः हंटर बायडेन यांनी प्रसिद्धी माध्यमांना याबाबतची माहिती दिली.
या प्रकरणी प्रांतिय तपास अधिकाऱ्यांनी मंगळवारी हंटर बायडेन यांची चौकशी केली असल्याचे बायडेन कुटुंबीयांशी संबंधित व्यक्तींनी सांगितले. हंटर बायडेन यांनी कर चुकवेगिरी केली असल्याच्या संशयातून ही चौकशी केली गेली.
बायडेन यांनी वर्षभरापूर्वी अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी स्वतःची उमेदवारी जाहीर केली, तेंव्हापासून हंटर बायडेन यांच्यावर कर चुकवेगिरीचा आरोप केला जाऊ लागला होता. मात्र निवडणूकीची प्रक्रिया सुरू असताना तपास अधिकाऱ्यांना या संदर्भात तपास करता आलेला नव्हता.
हंटर बायडेन यांनी मात्र हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले आहे. आपले सर्व व्यवहार कायद्याला अनुसरून अणि व्यवस्थित हाताळले असल्याचे या चौकशीतून निष्पन्न होईल, असा विश्वास हंटर बायडेन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात व्यक्त केला आहे.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हंटर बायडेन यांच्यावर वारंवार टीका करत राहिले होते. ज्यो बायडेन यांच्या राजकीय संपर्कातून हंटर बायडेन लाभ मिळवत आहेत. ओबामा प्रशासनात ज्यो बायडेन उपाध्यक्ष असताना युक्रेनमधील व्यवहारांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता.