पालकमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्तांना दिले आदेश
पुणे – पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत. त्याचा अहवालही त्यांनी त्वरित मागवला आहे.
रायकर यांना जम्बो कोविड हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी ऍम्ब्युलन्स वेळेत उपलब्ध झाली नाही. या सर्व घटनेची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे.
दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही “याबाबत चौकशी केली जाईल. या संदर्भात जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या आहेत,’ असे म्हटले आहे.
रायकर यांच्या कुटुंबीयांना भाजप, राष्ट्रवादीकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत
“रायकर यांच्यावर वेळीच उपचार झाले नाहीत, या प्रकरणाची सर्वच हॉस्पिटल्सनी गंभीर दखल घेण्याची गरज आहे,’ अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
रायकर यांच्या कुटुंबाला “राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वेल्फेअर फंडा’तून पाच लाख रुपयांची मदत सुळे यांनी जाहीर केली आहे. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही रायकर यांच्या कुटुंबीयांसाठी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. “करोना रुग्णावर उपचार करण्यासाठी राज्य सरकारने पुरेशी यंत्रणा उभारली नाही हे यातून स्पष्ट होते. करोनाची तपासणी करणे किंवा लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करणे याबाबतीत राज्यामध्ये सर्व अधिकार हे राज्य सरकारकडे एकवटले आहेत. सरकारी यंत्रणेने पूर्ण एकजुटीने प्रयत्न करून रुग्णांवर वेळीच उपचार होतील याची दक्षता घेणे गरजेचे आहे,’ असे पाटील यांचे म्हणणे आहे.
पुण्याच्या आरोग्य सेवेत दैनंदिन लक्ष द्यावे
करोनाबाधितांवरील उपचारासाठी पुण्यात जम्बो केअर सेंटर उभे केले पण तिथेही सुविधांचा अभाव आहे, एकीकडे या साथीचा प्रकोप आहे आणि दुसरीकडे रूग्णांची हेळसांड होते आहे. आता तरी मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या आरोग्य सेवेत दैनंदिन लक्ष घालावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.