महापालिकेतील निविदा प्रक्रियांची चौकशी करा

माजी खासदार शिवाजीराव आढळरावांचा “यू टर्न’


दोन हजार कोटींच्या निविदांमध्ये अनागोंदी झाल्याची तक्रार

पिंपरी – लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपाच्या कारभाराचे गोडवे गाणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी “यु टर्न’ घेतला आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार करत महापालिकेत गेल्या दोन वर्षांत झालेल्या निविदा प्रक्रियांमध्ये तब्बल दोन हजार कोटींचा अनागोंदी कारभार झाला असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती होती. त्यावेळी झालेल्या प्रचारसभांमध्ये पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे आणि स्थानिक भाजपा आमदारांचे गोडवे आढळराव यांनी गायले होते. भाजपा आणि शिवसेनेची युती संपुष्टात येऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आढळराव यांना पालिकेतील भ्रष्टाचाराच्या कारभारावर आसूड ओढण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेत सध्या चर्चेत असलेल्या यांत्रिकीकरणाद्वारे साफसफाई करण्याच्या निविदा प्रक्रियेलाही आढळराव यांनी आक्षेप घेतला असून याबाबत त्यांनी नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

सहा ते सात ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून यांत्रिकी पद्धतीने साफसफाईची निविदा प्रक्रिया राबविली जात असून ही निविदा तब्बल 647 कोटी रुपयांची आहे. या निविदा प्रक्रियेत रिंग झाली असून सर्व प्रकार पदाधिकारी, अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने सुरू असल्याचा आरोप आढळराव यांनी केला आहे. पुण्यामध्ये यांत्रिकीकरणाद्वारे सफाई करण्याचा प्रयोग फसल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका ही निविदा प्रक्रिया राबविण्याचा प्रकार चुकीचा असल्याने ही सदोष निविदा तात्काळ रद्द करण्याबाबतचे आदेश देण्यात यावेत, अशीही मागणी आढळराव यांनी केली आहे.

सर्व निविदांची चौकशी करा
सन 2017 पासून राबविण्यात आलेल्या अनेक निविदांमध्ये अफरातफर झाली असून सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या निविदा या संशयास्पदरित्या राबविण्यात आल्या आहेत. ठेकेदारांची रिंग, जागा ताब्यात नसताना काढलेले कामाचे आदेश, वाढीव दर, चुकीची लांबी-रुंदी दाखवून करण्यात आलेली कामे यामुळे निविदांच्या रक्कमा फुगविण्यात आल्या आहेत. या संपूर्ण निविदांची तत्काळ सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आढळराव यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.