उत्तरप्रदेशच्या कारागृहात कैद्यांचा धुमाकूळ

बलिया – उत्तरप्रदेशातील बलिया जिल्हा कारागृहात कारागृह कर्मचाऱ्यांनी काही कैद्यांकडून मोबाईल फोन व सीमकार्ड जप्त केल्यानंतर तेथील कैद्यांनी चांगलाच धुमाकुळ घातला. त्यांनी तुरूंग कर्मचाऱ्यांवर हल्ले केले त्यात चार कर्मचारी जखमी झाले आहेत.

नंतर पोलिसांची जादा कुमक मागवून या कैद्यांना आटोक्‍यात आणण्यात आले. या प्रकरणात एकूण 119 कैद्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकारानंतर पोलिसांनी कारागृहात सर्वत्र कसून तपास केला असता त्यांना तेथे चौदा मोबाईल फोन्स आणि दोन सीम कार्डे सापडली ती जप्त करण्यात आली आहेत.

गुरूवारी रात्री हा प्रकार घडला. कारागृहातींल एक कर्मचारी एका बराकीचे दार उघडत असताना तेथील कैद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर अन्यही कैद्यांनी तेथे आकांडतांडव केला. कारागृहाचे कर्मचारी आपल्यावर अत्याचार करीत असल्याचा आरोप करीत काही कैद्यांनी आज तेथे उपोषण सुरू केले आहे.

काही कैद्यांनी अन्य कैद्यांना भडकाऊन कारगृहातील वातावरण बिघडवले असल्याचा आरोप जेल प्रशासनाने केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.