आनंदनगरवासीयांवर होतोय अन्याय

पिंपरी – चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टीमध्ये करोना विषाणूने थैमान घातले आहे. दाट लोकवस्तीमध्ये करोनाचा शिरकाव झाल्याने मोठ्या प्रमाणावर करोनाचे रुग्ण सापडत आहेत. येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी क्वॉरंटाइन करण्यासाठी महापालिकेने पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. परंतु याला स्थानिक नगरसेवकांनी विरोध केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे, त्याला वाचा फोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात बंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गुलाब पाटील यांनी म्हटले आहे की, आनंदनगर परिसरात दाट लोकवस्ती असल्याने येथील नागरिकांना इतरत्र क्‍वॉरंटाइन करणे गरजेचे आहे. त्यानुसार महापालिका कार्यवाही करत आहे. परंतु शिवसेनेचे नगरसेवक अमित गावडे व राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू मिसाळ यांनी याला विरोध दर्शविला आहे.

त्यामुळे झोपडपट्टीतील नागरिकांवर अन्याय होत आहे. एक तर सत्ताधारी आणि महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने येथे मोठ्या प्रमाणावर करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात महाविकास आघाडीचे नगरसेवकदेखील विरोध करतात त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घालून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करून झोपडपट्टीवासीयांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.