पुणे – भरधाव पीएमपी गतिरोधकावरून गेल्याने एका ज्येष्ठ नागरिकाच्या मणक्याला दुखापत झाल्याची घटना नुकतीच कात्रज भागात घडली. पीएमपी चालकाच्या बेजबाबदारपणामुळे दुखापत झाल्याची तक्रार दिल्यानंतर चालकाविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पीएमपी चालक अस्लम कादर शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पीएमपी प्रवासी राजू मोतीराम चिंचवडकर (वय ६१, रा. आंबेगाव खुर्द, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चिंचवडकर २७ नोव्हेंबर रोजी लोहगाव ते कात्रज या मार्गावरील बसमधून प्रवास करत हाेते. कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयासमोर भरधाव पीएमपी बस गतिराेधकावरून पुढे गेली. त्यावेळी पीएमपी प्रवासी चिंचवडकर आसनावरून पडले. त्यांच्या मणक्याला दुखापत झाली.
चिंचवडकर यांनी अस्थिरोग तज्ञांकडे उपचार घेतले. मणक्याला दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर चिंचवडकर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहाय्यक फाैजदार मोहन देशमुख तपास करत आहेत.