धर्मशाला – भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज इशान किशन याची प्रकृती उत्तम असून त्याची दुखापत गंभीर नसल्याचा निर्वाळा बीसीसीआयने दिला आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरु कुमाराचा बाऊन्सर चेंडू इशान किशनच्या हेल्मेटवर आदळला होता.
कुमाराने 147 किमीप्रतीतास वेगाने टाकलेल्या चेंडूवर इशान पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता. पण चेंडू इशान किशनच्या हेल्मेटवर येऊन आदळला. त्यानंतर इशान किशन काही वेळासाठी जमिनीवर बसला.
इशानला होणारी गंभीर दुखापत हेल्मेटमुळे टळली. इशानला जोरात चेंडू लागल्याचे लक्षात येताच श्रीलंकेचे खेळाडू मदतीसाठी धावले. त्यानंतर इशानला कांगडाच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्याला आयसीयुमधून सामान्य कक्षात हलवण्यात आले असून त्याची दुखापत गंभीर नाही, असेही बीसीसीआयने म्हटले आहे.