लोणावळा, दि. 1 (वार्ताहर) -राजमाचीच्या दरीत असलेल्या कातळधार धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका पर्यटक मुलीचा दगडावरून पाय घसरून अपघात झाला. या अपघातात तिचा पाय फ्रॅक्चर झाल्याने तिला खोल दरीतून पुन्हा वर घेऊन येणाचा अवघड रेस्क्यू शिवदुर्ग बचाव पथकाने केला.
ही घटना रविवारी (दि.31) दुपारी घडली. पुण्यात नोकरीला असलेली सुप्रिया गवने (रा. मुळची नागपूर, सध्या पुणे) ही तिच्या इतर पाच मित्र मैत्रिणींसोबत लोणावळ्याजवळील राजमाचीच्या दरीत असलेल्या कातळधार धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी ट्रेक करीत गेली होती. त्यावेळी धबधब्याजवळील एका दगडावरून पाय घसरून ती पडली. या अपघातात सुप्रिया हिच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने तिला जागेवरून हलता येईना.
त्याचवेळी शिवदुर्ग बचाव पथकाची सदस्या असलेली प्राजक्ता बनसोड ही त्याठिकाणी दुसऱ्या एका ग्रुपसोबत ट्रेक साठी गेली होती. तिने परिस्थितीचे गांभिर्य ओळखून तत्काळ शिवदुर्गला फोन करून मदतीची गरज असल्याचे सांगितले. शिवदुर्ग बचाव पथकाचे सदस्य घटनास्थळी पोहचल्यानंतर जखमी सुप्रिया हिच्यावर प्रथमोपचार करून तिला स्ट्रेचरवर घेतले. तद्नंतर घनदाट जंगलातून अवघड व चढणीच्या वाटेने मुख्य रस्त्यापर्यंत आणले व त्यानंतर रुग्णवाहिकेमधून पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.