पुणे – मिळकतकराची थकबाकी भरण्यासाठी महापालिकेकडून वारंवार नोटीस पाठवूनही नोटीसला दाद न देणाऱ्या मिळकती आता पालिकेकडून ताब्यात घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशा मिळकती महापालिका “सील’ करणार असून त्याचा लिलाव केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात अशाच सील केलेल्या 9 मिळकतींचा लिलाव पालिकेने सुरू केला असून दुसऱ्या टप्प्यात आता आणखी 21 मिळकतींवर महापालिकेने आपले नाव लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
महापालिकेच्या मिळकतकराच्या थकबाकीचा आकडा गेल्या चार वर्षांत साडेपाच हजार कोटींवर गेला आहे. त्यात प्रामुख्याने जवळपास अडीच लाख थकबाकीदार असून त्यांच्याकडून गेली अनेक वर्षे पालिकेने सवलत देऊनही कर भरलेला नाही, त्यामुळे अशा मिळकती पालिकेने सील करण्यास सुरुवात केली आहे.
त्यानंतरही या मिळकत धारकांना पालिकेने मुदत दिली असून त्यानंतरही प्रतिसाद मिळत नसल्याने मोठ्या थकबाकीदारांच्या मिळकतींना सील करण्याची कारवाई केली आहे. पहिल्या टप्यात 21 मिळकतींचा समावेश आहे, त्यामधील 15 मिळकतींची 12 कोटींची थकबाकी आहे.
कारवाईच्या भीतीने भरला कर…
वारजे येथील सिद्धी डेव्हलपर्सच्या मिळकतीच्या सातबारावर पालिकेचे नाव लावण्याची कारवाई अंतिम टप्यात असतानाच या थकबाकीदाराने गुरूवारी तातडीने 68 लाखांच्या थकित कराचे धनादेश पालिकेकडे जमा केले. त्यामुळे कारवाई थांबविण्यात आली. सहआयुक्त विलास कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन अधिकारी रविंद्र ढावरे, विभागीय निरीक्षक कमलेश प्रधान यांच्या पथकाने ही कारवाई केली.