नवी दिल्ली – एकीकडे शेअरबाजाराचे निर्देशांक विक्रमी पातळीवर असतानाच पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादकता मात्र कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. गेल्या आठवड्यात औद्योगिक उत्पादन कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली होती. फेब्रुवारी महिन्यात पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादकता केवळ 2.1 टक्के असल्याचे सरकारने जाहीर केले आहे.
क्रुड आणि तेल शुद्धीकरण क्षेत्रात उत्पादकता कमी झाल्यामुळे पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादकता कमी झाली आहे. या क्षेत्रात तेल शुद्धीकरणाशिवाय कोळसा, नैसर्गिक वायू, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज उत्पादनाचा समावेश आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात या क्षेत्राची उत्पादक 5.4 टक्क्यांनी वाढली होती. फेब्रुवारी महिन्यात खत उत्पादकता 2.5 टक्क्यांनी, पोलादाची उत्पादकता 4.9 टक्क्यांनी, सिमेंटची उत्पादकता 8 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र वीज उत्पादन केवळ 0.7 वाढले आहे. कोळसा आणि नैसर्गिक वायू क्षेत्राची उत्पादकता बऱ्यापैकी म्हणजे 7.3 टक्के आणि 3.8 टक्क्यांनी वाढली आहे.
मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राच्या उत्पादकतेत घट
शेअर निर्देशांक वेगाने वाढत असतानाच विविध क्षेत्रांतील उत्पादकता कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. मंगळवारी निकेई इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर निर्देशांक म्हणजे पीएमआय जाहीर करण्यात आला. त्यानुसार मार्च महिन्यातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पदकता 52.3 टक्के भरली आहे. फेब्रुवारी महिन्यात हा पीएमआय 52.3 टक्के होता. मात्र तरीही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. पीएमआय पन्नास टक्क्यांच्या वर असल्यास आगामी काळात यात वाढ होण्याची शक्यता खुले असते.