नवी दिल्ली – लॉक डाऊन संपुष्टात आले असले तरी पायाभूत क्षेत्रातील उत्पादकता अजून पुनर्जीवित झालेली नाही. डिसेंबरमध्ये पायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 1.3 टक्के इतकी मोजली गेली आहे.
तेल आणि नैसर्गिक वायू, क्रुड, तेल शुद्धीकरण, खत, पोलाद आणि सिमेंट क्षेत्राची उत्पादकता वाढली नसल्यामुळे एकूणच पायाभूत क्षेत्राचा उत्पादकतेवर परिणाम झाला असल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पायाभूत क्षेत्राची उत्पादकता 3.1 टक्के इतकी नोंदली गेली होती.
वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे की, कोळसा आणि वीज क्षेत्र वगळता इतर क्षेत्राची उत्पादकता नकारात्मक पातळीवर आहे.
पायाभूत क्षेत्राची उत्पादकता कमी झाल्यामुळे डिसेंबर महिन्यात एकूणच औद्योगिक उत्पादनही कमी राहणार आहे. कारण एकूण उद्योगिक उत्पादनामध्ये पायाभूत क्षेत्राचा 40.27 टक्के इतका वाटा असतो.