नवी दिल्ली – लॉकडाऊनमुळे पायाभूत क्षेत्राच्या उत्पादकतेवर प्रचंड परिणाम झाला आहे. या क्षेत्रातील 8 मोठ्या उद्योगांची उत्पादकता जून महिन्यात 15 टक्क्यांनी कमी झाली आहे.
या क्षेत्रांमध्ये कोळसा, क्रुड तेल, नैसर्गिक वायू, पोलाद, सिमेंट आणि वीज उत्पादनाचा समावेश आहे. गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये या क्षेत्राची उत्पादकता 1.2 टक्क्यांनी वाढली होती. मात्र, यावर्षी उणे 15 टक्के इतकी झाली आहे. खत क्षेत्र वगळता इतर सात क्षेत्रांतील उत्पादकता उणे नोंदली गेली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत पायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 24.6 टक्के इतकी नोंदली गेले आहे.
गेल्या वर्षी या तिमाहीत पायाभूत क्षेत्राची उत्पादकता 3.4 टक्क्यांनी वाढले होती. या आकडेवारीमुळे औद्योगिक उत्पादनही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्याचा थेट परिणाम या तिमाहीतील राष्ट्रीय उत्पन्नावर होणार आहे. या वर्षाचे राष्ट्रीय उत्पन्न उणे पाच टक्के होणार असल्याचे बऱ्याच पतमानांकन संस्थांनी सांगितले आहे.