एक लाख भारतीयांच्या माहितीची चोरी

नवी दिल्ली – सुमारे एक लाख भारतीयांच्या वैयक्तिक माहितीची चोरी झाली असल्याचा दावा “सिब्ल’ या सायबर इंटेलिजन्स कंपनीने केला आहे. चोरी झालेली माहिती सरकारी यंत्रणेकडून नव्हे तर अन्य कोणाकडून तरी उपलब्ध झालेली होती. या चोरी झालेल्या माहितीमध्ये या नागरिकांचे आधार कार्ड, पॅन आणि पासपोर्टसारख्या राष्ट्रीय ओळखपत्र दर्जाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या कॉपीचा समावेश आहे. ही सर्व माहिती विक्रीसाठी डार्कवेबवर उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही संबंधित कंपनीने म्हटले आहे.

ही चोरी करणाऱ्या सायबर चोरांनी आपल्याजवळील उपलब्ध डाटाचे सॅम्पल इंटरनेटवर प्रसिद्ध केले आहे. देशभरातील सुमारे एक लाख व्यक्‍तींची माहिती आपल्याजवळ असल्याचा दावा या सायबर चोराने केला आहे. या सायबर चोराकडील 1 हजार जणांच्या डाटाची पडताळणी केल्यावर हे सर्वजण भारतीयच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

“सिब्ल’च्या संशोधकांकडून या संदर्भात अधिक तपास केला जात आहे, असे “सिब्ल’ने म्हटले आहे.
नागरिकांनी आपली वैयक्तिक माहिती विशेषतः वित्तीय व्यवहारांशी संबंधित मोबाईल नंबर, ईमेल आयडी अथवा एसएमएस कोणालाही देऊ नये, असेही “सिब्ल’ने म्हटले आहे. मे महिन्यात 7.65 कोटी भारतीयांची वैयक्तिक माहिती अशाच प्रकारे डार्कवेबवर टाकली गेल्याची दोन उदाहरणे “सिब्ल’ने दर्शवली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.