खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज

राज्यमंत्री डॉ.विश्‍वजीत कदम यांची माहिती

पुणे – लॉकडाऊनमुळे शेतीशी निगडीत कोणतीही कामे अडू नयेत, यासाठी शेतकऱ्यांनी सोशल डिस्टंन्सिंग व आवश्‍यक ती खबरदारी घेवून ही कामे करण्यासाठी शासनाने शिथिलता दिली आहे. यापुढेही शेती विषयक कामे सुरु ठेवण्यास कोणतीही अडचण येणार नाही. खरीप हंगामाच्या दृष्टिने कृषी विभागाने योग्य ते नियोजन केले असून यासाठी शासनाचा कृषी विभाग सज्ज आहे,अशी माहिती राज्य मंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांनी दिली.

कृषीमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि.28) पार पडलेल्या कृषी आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला सर्व महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना कोणतीही अडचण भासू नये, यासाठी संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. सांगली जिल्ह्यात द्राक्ष पिकाचे उत्पादन मुबलक प्रमाणात होते. याचा विचार करुन सांगली जिल्ह्यात द्राक्ष निर्यातीसाठी उर्वरीत अंश तपासणी प्रयोगशाळा सुरु करण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती डॉ. कदम यांनी यावेळी दिली.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, कोरोनामुळे कृषीक्षेत्राशी निगडीत विषय प्रलंबित राहू नयेत, याची दक्षता घेवून जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संयुक्तपणे वेळोवेळी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे आढावा घेण्यात येत आहे. तसेच नियोजन करुन खरीप हंगामासाठीची कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील, अशी हमी त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.