जामखेड तालुक्यात हजारो हेक्टरवरील पिके संकटात : फवारणीमुळे खर्चात वाढ
जामखेड – तालुक्यातील हजारो हेक्टरवरील बहरलेले ज्वारीचे पिक चिकटा, मावा रोगांच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडले आहे. या रोगांचा ज्वारीच्या उत्पादन वाढीवर परिणाम होणार असल्याने दिसत असून, ज्वारीसारख्या पिकांवरही औषधांची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चाच वाढ झाली आहे.
जामखेड तालुक्यात यावर्षी सुरुवातीलाच पावसाने धोका दिल्याने खरीप हंगाम वाया गेला. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आशा ही रब्बीतील पिकांवर होती. मराठवाड्याच्या सरहद्दीवर असलेला जामखेड तालुका हा ज्वारीचा पट्टा म्हणून ओळखला जातो. त्यातच यावर्षी या भागातील खरीप हंगाम वाया गेल्याने या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणावर रब्बीची पेरणी झाली.
हजारो हेक्टरवर सर्वाधिक पेरा हा ज्वारीचा झाला आहे. सध्या या भागातील ज्वारीचे पीकही काही ठिकाणी पोटरीत तसेच वाढीच्या अवस्थेत आहे. मात्र, सध्या या ज्वारी पिकावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर मावा व चिकटा या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हजारो हेक्टरवरील ज्वारीचे पीक संकटात सापडले आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना न केल्यास ज्वारीच्या उत्पादन वाढीवर गंभीर परिणाम होणार असल्याचे दिसत आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील उत्पन्नाच्या आशेवरही पाणी फिरणार असल्याचे दिसत असून, ज्वारी उत्पादक चिंताग्रस्त आहेत.
सध्या ज्वारीचे पीक काही ठिकाणी पोटरीत, तर काही ठिकाणी वाढीच्या अवस्थेत आहे. अशा अवस्थेतच चिकटा, मावा ज्वारीच्या पानावर, ताटावर पडल्याने ज्वारीच्या ताटातील रस ही मावा कीड शोषून घेत असल्याने त्या ताटाची ताकद कमी होते. परिणामी ज्वारीचे दाणे बारीक तर काही ठिकाणी भरतही नाहीत. त्यामुळे एकंदरीतच चिकटा माव्यामुळे उत्पादनावर गंभीर परिणाम होणार आहे. या रोगांमुळे शेतकऱ्यांना विविध फरावारे पिकांवर मारावे लागत आहेत. त्यामुळे त्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.