डिकसळ- इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड झाली. सध्या मका पिकांवर मोठ्या प्रमाणात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. शेतकऱ्यांना औषध फवारणी करावी लागत आहे. पण एका महिन्यात चार चार वेळा फवारणी करून देखील अळीवर नियंत्रण मिळत नाही. त्यामुळे उत्पादनाच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे.
या अळीच्या प्रादुर्भावाने मक्याची पाने कुरतडलेली, पानावरीलमधली शीर सोडून इतर भाग खाल्लेला दिसून येतो. तसेच मक्यातील मधल्या पोंग्यामध्ये या किडीची अळी दिसते व खराब झालेल्या भागामध्ये अळीची विष्ठा दिसून येते. या अळीची भुक मोठी असल्याने अळी मकेचा पोगा कुरतड असल्याने परिणामी पिकांची वाढ खुंटत आहे.
मक्याच्या पिकाला जनावरांच्या चाऱ्यासाठी मोठी मागणी आहे. तसेच कुक्कुटपालन व्यवसायात कोंबड्यांच्या खाद्यासाठी मक्याची मागणी असते. सध्या बाजारपेठेत क्किटला 1900 ते 2200 रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने मक्याच्या पिकाची लागवड झाली आहे.