संगमनेरात मक्‍यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव

संगमनेर – कधी दुष्काळ, कधी बोंडअळी, तर कधी लष्करी अळीने शेतकरी संकटात सापडले आहे. गतवर्षी दुष्काळाच्या संकटाला तोंड दिल्यानंतर यावर्षी शेतकरी मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीच्या संकटाला तोंड देत आहे. संगमनेर तालुक्‍यातील सुमारे 65 ते 70 टक्के मका पीक हे लष्करी अळीग्रस्त झाले आहे. त्यामुळे भविष्यात मका इंडस्ट्रीवर मोठा परिणाम होणार असून, सध्या मका 2200 ते 2400 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे.

संगमनेर तालुक्‍यात आठ हजार 692 हेक्‍टरवर मका लागवड करण्यात आली आहे. मात्र समाधानकारक पाऊस नसल्याने अगोदरच शेतकरी संकटामध्ये सापडला आहे. हे कमी की काय म्हणून अमेरिकन लष्करी अळीने मका पिकावर हल्ला चढविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मका उत्पादनाचा चारा करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. तज्ज्ञांच्या मते सुमारे 65 ते 70 टक्के मका पिकाचे नुकसान होणार आहे.

गहू, बाजारी अन्‌ तांदळाचा वापर पोल्ट्री खाद्यपदार्थात होतो. त्यात मक्‍याचा सर्वाधिक वापर होतो. मात्र यंदा मका उत्पादनात घट राहणार म्हणून दरात आतापासूनच तेजी निर्माण झाली असून, 22 ते 24 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. त्यामुळे कंपन्यांना आता खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी 30 टक्के गहू, बाजारी आणि तांदळाचा वापर करावा लागत आहे. विशेष म्हणजे सध्या राज्यात मका नसल्याने बिहार आणि उत्तर प्रदेशमधून मका मागवावी लागत असल्याचे मका व्यापाऱ्यांनी सांगितले.

दोन एकरमध्ये मका पिकाची लागवड केली होती. अगोदरच पावसाने अवकृपा केल्याने मका सुकला होता. त्यामध्ये पुन्हा अमेरिकन लष्करी अळीने संपूर्ण पिकावर हल्ला चढवल्याने दुबार पेरणीचे संकट आले आहे. तसेच अगोदरचे संपूर्ण बियाण्याचे पैसे वाया गेले.
सखाराम राहणे , आनंदवाडी, मका उत्पादक शेतकरी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.