५० किलो आटा घेण्यासाठी मोजावे लागतात २३०० अफगाणी
काबुल : ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानमध्ये आपली राजवट स्थापन करणाऱ्या तालिबान्यांची आर्थिक मदत अमेरिकेने गोठवल्यामुळे त्याचे आर्थिक परिणाम आता दिसू लागले असून अफगाणिस्तानमध्ये महागाईने कहर गाठला आहे.
नागरिकांच्या दैनंदिन आहाराचा भाग असलेल्या गव्हाच्या पिठाच्या पन्नास किलोच्या पोत्यासाठी तब्बल २३०० अफगाणी मोजावे लागत आहेत. देशात तालिबानी राजवट येण्यापूर्वी या 50 किलो पोत्यासाठी तेराशे अफगाणी मोजावे लागत होते. इतर सर्वच जीवनावश्यक वस्तू याच प्रमाणात महाग झाल्या आहेत आणि त्यांची टंचाई भासू लागली आहे.
तालिबान राजवट प्रस्थापित झाल्यानंतर अमेरिकेने संपूर्ण आर्थिक मदत गोठवली असल्याने तालिबान्यांना निधीच उपलब्ध होत नाही. त्यामुळे सर्व सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांचा पगार गेले दोन महिन्यांपासून प्रलंबित आहे. लोकांच्या हातात एकीकडे पैसा नाही ते दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर महागाई वाढत आहे.
तालिबान सरकारचा प्रवक्ता मुजाहिद याने या सर्व घडामोडींसाठी अमेरिकेला जबाबदार धरले आहे. आता अमेरिका आणि इतर देशांनी तालिबान राजवटीला मान्यता देऊन आर्थिक मदत पूर्ववत सुरू करावी अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.