महागाई कमी होईल – सुब्रमण्यन

वाहतूक व्यवस्थेतील अडथळ्यांचा परिणाम कमी होणार

नवी दिल्ली – घाऊक किमतीवर आधारित वाढलेली महागाई लवकरच कमी होईल, असा दावा अर्थमंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यन यांनी केला आहे.

ते म्हणाले की, घाऊक किमतीवर आधारित महागाई आणखीही कमी आहे. मात्र, पुरवठ्यातील अडथळ्यामुळे किरकोळ किमतीवर आधारित महागाई वाढली आहे. ही बाब ध्यानात घेण्याची गरज आहे. जुलै महिन्यामध्ये किरकोळ किमतीवर आधारित महागाई 6.93 टक्‍के इतके मोजली गेली आहे. रिझर्व्ह बॅंकेने किरकोळ किमतीवर आधारित महागाई 4 टक्‍क्‍यांच्या आत रोखण्याचे ठरविले असतानाही महागाई त्यापेक्षा कितीतरी जास्त पातळीवर असल्यामुळे चिंता व्यक्‍त करण्यात येत आहे.

मात्र, सुब्रमण्यन म्हणाले की, ही बाब ध्यानात घेतली पाहिजे की जुलै महिन्यामध्ये घाऊक किमती वरील महागाईचा दर उणे 0.58 टक्‍के इतका आहे. याचा अर्थ घाऊक बाजारात किमती कमी आहेत. मात्र, त्या वस्तू किरकोळ बाजारात वाहून नेताना लॉकडाऊन आणि इतर कारणांमुळे अडथळे आलेले आहेत. आता रेल्वे आणि ट्रक वाहतूक पूर्ववत होत आहे. त्यामुळे एक-दोन महिन्यांमध्ये वाहतूक सुरळीत होईल आणि महागाई कमी होईल.

विकासदराबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, अर्थव्यवस्था लॉकडाऊनमुळे ठप्प झाल्यामुळे विकासदर काही महिने कमी पातळीवर राहण्याची शक्‍यता आहे. मात्र, त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढेल. फक्‍त काही अन्नधान्याची महागाई वाढली आहे, इतर वस्तूंचे दर स्थिर आहेत, असे ते म्हणाले.

घाऊक महागाईच्या दरात वाढ
सोमवारी ऑगस्ट महिन्यातील घाऊक मागायची आकडेवारी जाहीर झाली. त्यानुसार ही महागाई वाढून 0.16 टक्‍के इतके झाली आहे. याअगोदर चार महिने ही महागाई शून्य टक्‍क्‍याच्या खाली होती. मात्र, किरकोळ किमतीवरील महागाई ऑगस्ट महिन्यात कमी होऊन 6.69 टक्‍के झाली. ती जुलैमध्ये 6.73 टक्‍के होती.

Leave A Reply

Your email address will not be published.