नवी दिल्ली : देशभरात महागाईने सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. त्यातच आज पुन्हा एकदा या महागाईने मोठा झटका दिला आहे. आज पुन्हा घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांत चांगलीच वाढ झाली आहे. आता संपूर्ण देशभरात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती 1000 पार पोहोचल्या आहेत.
आज घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये 3 रुपये 50 पैशांची वाढ झाली आहे. तर, व्यावसायिक गॅस सिलेंडर 8 रुपयांनी महागला आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 14.2 किलोंचा घरगुती एलपीजी सिलेंडर 1003 रुपयांना मिळणार आहे. गेल्या एका वर्षात दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 809 रुपयांवरून 1003 रुपयांवर गेला आहे.
आज, एलपीजीची किंमत कोलकातामध्ये 1029 रुपये आणि चेन्नईमध्ये 1018.5 रुपयांवर पोहोचली आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चटका लागणार आहे, हे नक्की. घरगुती सिलेंडरच्या दरांत केवळ 12 दिवसांत झालेली ही दुसऱ्यांदा दरवाढ आहे.
यापूर्वी 7 मे 2022 रोजी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ झाली होती आणि त्यावेळी एलपीजीच्या दरांमध्ये 50 रुपये प्रति सिलेंडर वाढ करण्यात आली होती. त्यासोबतच मे महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांत दोनदा वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमतही आठ रुपयांनी वाढवण्यात आली आहे.