महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा फटका; आजपासून गॅस सिलेंडरमध्ये तब्बल ‘एवढ्या’ रुपयांची वाढ

नवी दिल्ली : देशात महागाईचा भडका दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. रोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने हैराण झालेल्या नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. कारण वर्षाच्या शेवटच्या महिन्यात एलपीजी सिलेंडरमध्ये भरघोस वाढ झाली असल्याने जनतेला मोठा झटका बसला आहे.

डिसेंबर महिन्याचा आजचा पहिलाच दिवस दिवस असून आजपासून गॅस सिलेंडर १०० रुपयांनी महाग झाला आहे. सामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरच्या दरांमध्ये झाली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ही वाढ केली आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडर २६६ रुपयांनी महागला होता, आता त्यात १००रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर २१०० रुपयांच्या पुढे आहे. दोन महिन्यांपूर्वी तो १७३३ रुपये होता. मुंबईत १९ किलोचा सिलेंडर २०५१ रुपयांचा झाला आहे. त्याचवेळी कोलकातामध्ये १९ किलोचा इंडेन गॅस सिलेंडर २१७४.५० रुपये झाला आहे. आता चेन्नईमध्ये १९ किलोच्या सिलेंडरसाठी २२३४ रुपये मोजावे लागणार आहेत.

दिल्लीत १४.२ किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत ८९९.५० रुपये आहे. सहा ऑक्टोबर रोजी त्याची किंमत वाढवण्यात आली होती. तर मुंबईतही घरगुती सिलेंडरची किंमत ८९९.५० रुपये आहे. जानेवारीत मुंबईत एलपीजी सिलेंडरची किंमत ६९४ रुपये होती, ती फेब्रुवारीमध्ये ७१९ रुपये प्रति सिलेंडर करण्यात आली.

१५ फेब्रुवारीला त्याची किंमत ७६९ रुपये करण्यात आली. यानंतर २५ फेब्रुवारीला एलपीजी सिलेंडरची किंमत ७९४ रुपये झाली. मार्चमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत ८१९ रुपये झाली होती. जुलैमध्ये ८३४.५०, तर १८ ऑगस्टला २५ रुपयांनी वाढून ८५९.५० रुपये झाले. यानंतर १ सप्टेंबरला त्यात २५ रुपयांनी वाढ झाली आणि ऑक्टोबरमध्ये १५ रुपयांनी महाग झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.