महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले

पेट्रोल वाढीच्या तडाख्यात आता गॅस दरवाढीचा भडका

चऱ्होली – औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला आलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. महाराष्ट्रासह बाहेर राज्यातून व्यवसायासाठी आलेल्या परप्रांतीय यांची सुद्धा संख्या लक्षणीय आहे.

कुटुंबाचा उदरनिर्वाह करून बचत केलेली काही रक्कम गावाकडे राहणाऱ्या कुटुंबासाठी तजवीज केल्या जाते. मात्र मागील वर्षात आलेल्या करोना काळात अनेकांच्या गेलेल्या नोकऱ्या व लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने दोनवेळाच्या जेवणाची परवड झाली होती. ही परिस्थिती अजून निवळली नाही तोच पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ होऊन शंभरी गाठल्याने महागाई वाढली आहे. त्यात भर पाडली ती गॅस सिलेंडरच्या दरवाढीने. यामुळे आधीच आर्थिक कंबरडे मोडलेल्या सामान्य नागरिकांवर आर्थिक संकटाची कुऱ्हाड कोसळली आहे.

केंद्र शासनाकडून फेब्रुवारी महिन्यात 3 वेळा गॅस सिलेंडरच्या भावात दरवाढ करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात 3 वेळा गॅस दरवाढ करण्यात आली. ती अनुक्रमे 4 फेब्रुवारीला 25 रुपये, 15 फेब्रुवारी 50 रुपये, तर 25 फेब्रुवारीला 25 रुपये अशी महिन्याभरात तब्बल 100 रुपयाने वाढ झाली आहे. दर महिन्यात होणारी दरवाढ 200 रुपयांपेक्षा अधिक झाल्याने महागाईत सर्वसामान्य मात्र होरपळून निघत आहेत. करोना बंद काळात आधीच हाताला काम नाही,

शिवाय ही झालेली दरवाढ यामुळे महिन्याभराचे घराचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्‍त केला आहे. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना शासनाने कमी किंमतीत उज्वला गॅस योजना राबविली; मात्र सरसकट दरवाढ झाल्याने ही योजना म्हणजे तोंडाला पाने पुसण्याची योजना झाली आहे.

गॅस दरवाढीमुळे सर्व सामन्याचे बजेट कोलमडले असून, घरखर्च सांभाळताना महिलांना किती काटकसर करावी, हा प्रश्‍न पडला आहे ? शासनाने उज्ज्वल योजना केवळ दिखावटीसाठी केली, असून भाववाढ करुन आमच्या सर्वसामान्य महिलांचे बजेट कोलमडून टाकले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना पुन्हा चुलीचा वापर करावा लागणार, अशी भीती निर्माण झाली आहे.
– सुनीता रेंगडे, दिघी


कुटुंब चालविण्यासाठी दैनंदिन गरजा पूर्ण करणे गरजेचे असते. रोज जेवण बनविण्याचा स्वयंपाक घरातील गॅस महाग झाल्याने अडचणीचे ठरत आहे. करोनामुळे आधीच घरातील पुरुष मंडळी काम नसल्याने घरी बसले असून, आर्थिक विवंचनेत कुटूंब आले आहे. अशा काळात शासनाने सिलिंडर भाववाढ केल्याने सर्वसामान्य कुटूंव हतबल झाले आहेत. शासनाने सर्व सामान्यांचा अंत पाहू नये. -अपर्णा मोहन भड, गृहिणी, भोसरी


गॅस महाग झाल्याने बचत गटांना त्यांच्या व्यवसायाला फटका बसला आहे. बचत गटाच्या माध्यमातून खानावळ तसेच इतर खाद्यपदार्थ बनविण्याचे काम आम्ही करतो. सर्व महागाई वाढल्याने आम्हाला सुद्धा भाववाढ करावी लागली. मात्र यामुळे ग्राहकांची संख्या घटून गटाचे उत्पन्न घसरले आहे. याशिवाय घरी बनविणाऱ्या पदार्थाला मागणी राहिली नाही.
– सीता किरवे, साईलीला बचत गट, दिघी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.