गॅस सिलिंडर 19 रुपयांनी महागला
नवी दिल्ली : देशात एकीकडे नवीन वर्षाचे स्वागत करण्यात सर्वजण मग्न आहेत तर दुसरीकडे नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी समोर येत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा दणका बसला आहे. स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर महागला आहे. सलग पाचव्या महिन्यात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे.
दराचा आढावा घेतल्यानंतर गॅस कंपन्यांनी बिगर अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या (14.2 किलो) दरात 19 रुपयांची वाढ केली आहे. आता घरगुती सिलिंडर 749 रुपये झाला आहे. तर व्यावसायिक सिलिंडर (19 किलो) 29.50 रुपयांनी महागले आहे. व्यावसायिकांना आता सिलिंडरसाठी 1325 रुपये मोजावे लागतील. तर पाच किलो वाला सिलिंडर सात रुपयांनी वाढला आहे. त्याला आता 276 रुपये द्यावे लागतील. यावेळी घरगुती गॅस ग्राहकांच्या खात्यात 238.10 रुपयांचे अनुदान जमा होईल. नवीन दर आज (बुधवार) सकाळपासून लागू झाले आहेत.
ऑगस्ट 2019 मध्ये 611.50 रुपये घरगुती गॅस सिलिंडरचा दर होता. तोच दर आता जानेवारी 2020 मध्ये 749 रुपये झाला आहे. म्हणजे मागील पाच महिन्यात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर 137 रुपयांनी वाढले आहेत. तर व्यावसायिक सिलिंडरचा वापर करणाऱ्यांवर 230 रुपयांचा बोजा पडला आहे.