मुंबई – देशात काही दिवसांपासून महागाईने उच्चांकी गाठल्याने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. त्यातच काही महिन्यांपासून घरगुती सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज पुन्हा एकदा घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. नवीन दरानुसार आता संपूर्ण देशभरात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती 1000 पार पोहोचल्या आहेत.
घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये आज 3 रुपये 50 पैशांची वाढ झाली आहे. तर व्यावसायिक गॅस सिलेंडर 8 रुपयांनी महागला आहे.या दरवाढीमुळे दिल्लीत घरगुती वापराचा 14.2 किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर 1003 रुपयांत उपलब्ध होईल. मुंबईत घरगुती वापराचा 14.2 किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर 1002.50 रुपयांत उपलब्ध होईल. कोलकाता येथे घरगुती वापराचा 14.2 किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर 1029 रुपयांत उपलब्ध होईल. चेन्नईत घरगुती वापराचा 14.2 किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर 1058.50 रुपयांत उपलब्ध होईल.
दरम्यान, गेल्या 12 दिवसात घरगुती सिलेंडरमध्ये झालेली ही दुसरी वाढ आहे. यापूर्वी 7 मे 2020 ला घरगुती सिलेंडरमध्ये 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यावेळेस सर्वसामान्य नागरीकांकडून या दरवाढीचा जोरदार विरोध करण्यात आला होता.