अत्यवस्थ रुग्णांना देणार इन्फ्लामेट्री इंजेक्शन
पुणे – करोनाने अत्यवस्थ बाधितांची प्रकृती सुधारावी, मृत्यू दर कमी व्हावा, यासाठी टॉसीलिझुमॅब (tocilizumab) हे इन्जेक्शन देण्याचा निर्णय पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यासाठी या औषधाची ऑर्डर दिल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे बाधितांसाठी हे इंजेक्शन आशेचा किरण ठरणार आहे.
एखाद्या व्यक्तीला करोनाची लागण झाल्यावर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करून घेतात. ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती चांगली आणि शरिरात ऍन्टिबॉडिज तयार होत असतात, त्यांना या आजाराचा फारसा त्रास होत नसल्याचे दिसून आले. मात्र, अनेकवेळा बाधित व्यक्तीची प्रकृती उपचारादरम्यान अचानक बिघडते आणि त्याला ऑक्सिजन किंवा व्हेन्टिलेटर लावण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत रुग्ण दगावण्याची भीती अधिक असते.
करोना विषाणूने शरिरात प्रवेश केल्यानंतर प्रथमत: फुफ्फुसावर परिणाम होतो. त्यामध्ये कधी-कधी बाधित रुग्ण क्षणात अत्यवस्थ होऊ शकतो. त्याला हायपर इन्फ्लामेन्ट्री रिऍक्शन होते. अशा परिस्थितीत त्याला टॉसीलिझुमॅबचे डोस दिल्यावर तो बरा होऊ शकतो. त्यामुळे महापालिकेकडून लवकरच या औषधांची खरेदी करून प्रत्यक्ष रुग्णांना हे डोस देण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
पहिल्या टप्यात 50 इन्जेंक्शनची ऑर्डर
टॉसीलिझुमॅबचे डोस सुरुवातील 25 रुग्णांना देण्यात येणार आहे. त्यामध्ये एका रुग्णाला 24 तासांत दोन डोस द्यावे लागणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात 50 इन्जेंक्शनची ऑर्डर देण्यात आली आहे. त्यानुसार या रुग्णांच्या प्रकृतीमध्ये काय सुधारणा होते, याची पाहणी करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.