नवी दिल्ली : भारताचा शेजारी देश पाकिस्तानने पुन्हा एकदा आपल्या कुरापती सुरू केल्या आहेत. अनेकदा शस्त्रसंधी आणि चर्चांच्या फेऱ्या होऊनही पाकिस्तानने एक ड्रोन भारतीय हद्दीत घुसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एका वृत्तसंस्थेने ट्वीट करून माहिती दिली आहे. दरम्यान, बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे हे ड्रोन वेळीच खाली पाडण्यात यश आले आहे.
शुक्रवारी पहाटे २.३० च्या सुमारास अमृतसरमध्ये रेअर कक्कर भागात हे ड्रोन दिसून आले. बीएसएफच्या जवानांना हे ड्रोन दिसताच त्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. ड्रोन कोसळल्यानंतर सकाळच्या सुमारास ते शोधून काढण्यातही बीएसएफला यश आले.
सीमारेषेवरील भारताच्या बाजूचे तारेचे कुंपण आणि झिरो लाईनच्या मध्ये हे ड्रोन पडलेले होते. यामध्ये काही संशयित वस्तू आढळल्याची माहिती बीएसएफकडून देण्यात आली असून त्याची तपासणी केली जात आहे. या भागात ड्रोनचे आणखीन काही हिस्से पडले असतील, तर त्यांचा शोध घेण्याचे काम चालू असल्याची माहिती बीएसएफकडून देण्यात आली आहे.