सोक्षमोक्ष: हीन प्रचार लोकशाहीला घातक

अशोक सुतार

लोकसभेच्या सतराव्या निवडणुकीसाठी देशात मतदान सुरू आहे. महाराष्ट्रात चौथा व शेवटचा टप्पा 29 एप्रिलला संपला आहे. देशात अनेक राज्यांत एकूण सात टप्प्यांपैकी पुढील निवडणूक टप्पे पार पडतील. ही निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरली आहे. या निवडणुकीत साम, दाम, दंड आणि भेद याचा पुरेपूर वापर झाल्याचे दिसत आहे. प्रचाराच्या बाबतीत अनेक पक्षांच्या नेत्यांनी आपली हीन भावना जनतेसमोर आणली. पश्‍चिम बंगालमध्ये मतदानावेळी दोन्ही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्‍चक्री झाल्याचे पाहावयास मिळाले तर काही ठिकाणी पोलीस अधिकारी वा मतदान अधिकाऱ्यांना धमकावण्याची मजल काही नेत्यांनी गाठली. हे वातावरण देशहितासाठी नक्‍कीच योग्य नाही.

सद्यःस्थितीतील प्रचार हा विकासाच्या मुद्द्यावरून न होता व्यक्‍तीद्वेष, जातीय द्वेषभावनेकडे वळला असल्याचे दिसत आहे. काही पक्षांच्या नेत्यांनी हिंदू-मुस्लीम तेढ वाढवणारी विधाने केली आहेत, त्यामुळे त्या पक्षांच्या नेत्यांना हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण करायचे आहे हे स्पष्ट होते. विरोधी पक्षांतील नेत्यांबद्दल सत्ताधारी पक्षाचे काही नेते खालच्या पातळीची विधाने करीत आहेत. त्यांच्या या प्रत्येक बेजबाबदार वक्‍तव्यासोबत ते आपल्या पक्षाला व राष्ट्रीय विचाराला लोकशाहीतील सुसंस्कृत आचरणाच्या दरडेवरून खाली ढकलत नेत आहेत. असे म्हणतात की, सत्तेची नशा सत्ताधाऱ्यांना सहन झाली नाही तर अनागोंदी माजते, मूर्ख मनुष्य सन्माननीय भासतो. पुन्हा सत्ता येण्यासाठी अशी मंडळी वाट्टेल ते करतात. मोठी आश्‍वासने देतील, नवी घोषणा करतील, प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेतील, जाहिरातबाजी यांचा जीव की प्राण असेल.

सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य देण्याऐवजी लोकांना नव्या, कल्पित विचारांकडे घेऊन जाणे म्हणजे लोकांची फसवणूकच होय. देशात सध्या वाचाळवीरांची काही कमी नाही. काही जण असे म्हणत आहेत की, देशात आजपर्यंत काहीच प्रगती करण्यात आलेली नाही, ती ऐतिहासिक कामगिरी आम्ही करत आहोत. लोकांनी आम्ही म्हणेल त्या रस्त्याने गेले पाहिजे आणि गेल्या सत्तर वर्षांत जो विकास झाला नाही तो आम्हीच करणार, अशा वल्गना देश गेली पाच वर्षे ऐकत आहे. लोकांनी नीट विचार केला पाहिजे की, राज्य नेमके कुणाचे हवे आहे, घोषणाबाजांचे की प्रत्यक्ष काम करणाऱ्यांचे, याचाही परखडपणे विचार करणे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे.

अमेरिकेत 2015 साली अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीच्या पूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोधकांविरोधात रान पेटवले होते. मेक्‍सिकोमधील नागरिकांबद्दल ट्रम्प यांनी अनेक आरोप केले होते. लोकांमध्येही ट्रम्प महाशय निवडून येऊ नयेत, याबद्दल संताप व्यक्‍त होत होता. परंतु ट्रम्प यांनी आपली कॉर्पोरेट यंत्रणा कार्यरत केली, सर्व प्रकार वापरले आणि अखेर नोव्हेंबर 2016 मध्ये ट्रम्प निवडून आले होते. नंतर जानेवारी 2017 मध्ये अमेरिकेचे 45वे अध्यक्ष म्हणून त्यांनी शपथही घेतली. भारतात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्पप्रमाणे असलेले अनेक उमेदवार आहेत. ते कदाचित या निवडणुकीत यशस्वीही होतील. नेत्यांनी व उमेदवारांनी केलेल्या बेजबाबदार विधानांतून द्वेष व अतिरेकाची उंची गाठली गेली. आता देशातील निवडणुकीचा अंतिम टप्पा जवळ येऊ लागला आहे, तसे या द्वेषाच्या राजकारणाला धार चढत जाणार आहे.

खासदार साक्षी महाराजांनी, यापुढे 2024 मध्ये निवडणुका होणार नाहीत. देशातील ही शेवटचीच निवडणूक आहे, असे या लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीला बेताल विधान करत निवडणुकीतील हीन प्रचाराला सुरुवात केली होती. खरे तर त्यांच्याविरोधात याचिका दाखल होणे गरजेचे होते की, पुढील निवडणूक होणार नाही असे म्हणता तर देशात काय हुकूमशाही आणणार आहात की काय? अपशब्द वापरण्याची हिंमत सत्ताधारी नेत्यांमध्ये कशी येते, सत्तेची नशा एवढी चढली आहे काय? असा प्रश्‍न निर्माण होतो. अपशब्द वापरणे हे आता काहीजणांच्या प्रचारातील कळीचे तंत्र बनले आहे. 18 मार्चला केंद्रीय मंत्री महेश शर्मा म्हणाले की, राहुल गांधींना पंतप्रधान व्हायचे आहे, तशीच इच्छा मायावती, अखिलेश यादव यांनीही व्यक्‍त केली आहे व आता राहुलसोबत प्रियांकाही आली आहे. महेश शर्मा यांनी 20 मार्चला मायावतींना लक्ष्य करताना आक्षेपार्ह शब्द वापरले. हे लांच्छनास्पद आहे.

निवडणुकीत टीकाटिप्पणी होत असली तरी नीतिमत्ता असली पाहिजे. ती नसेल तर लोकशाहीधिष्ठीत व्यवस्थेला गालबोट लागते. भाजप नेते रणजित बहादूर श्रीवास्तव यांनी 9 एप्रिलला असे विधान केले होते की, गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी मुस्लिमांचे नीतिधैर्य खच्ची केले आहे. तसेच मुस्लीमविरोधी वक्‍तव्य केले. हे विधान करताना श्रीवास्तव यांनी आपला मेंदू बाजूला काढून ठेवला होता की काय?

महाराष्ट्रातील मंत्री पंकजा मुंडे 21 एप्रिलला असे म्हणाल्या, विरोधकांना लक्ष्यभेदी हल्ले माहीत नाहीत. विरोधकाला बॉम्ब बांधून दुसऱ्या देशात पाठवले पाहिजे, मग विरोधकांना लक्ष्यभेद हल्ले म्हणजे काय ते समजेल. पंकजा मुंडे यांनी केलेले विधान लोकशाही राज्यातील आहे असे वाटते काय? इटावातील भाजप उमेदवार रामशंकर कठेरिया यांनी 23 मार्चला असे म्हटले की, आम्ही राज्य व केंद्रात सत्तेत आहोत. आमच्याकडे जे कुणी बोट दाखवतील त्यांची बोटे छाटून टाकू. या भाजप नेत्यांनी केलेली अपशब्दांची, द्वेषमूलक विधाने कोणत्या व्यवस्थेचे सूचक वाटतात? अजून देशातील निवडणुकीत मतदानाच्या आणखी फेऱ्या व काही दिवस बाकी आहेत. यात प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू असेल. सत्ताधारी नेते आणि काही विरोधकांची वक्तव्ये लोकशाहीच्या परिभाषेत बसणारी नसून त्यामुळे भवितव्यात लोकशाहीला समांतर अशी नवी व्यवस्था निर्माण होईल, असे वाटते. लोकशाहीला छेद देणारी वक्तव्ये, कृती, व्यक्‍तीद्वेष हे सर्व लोकशाहीला घातक आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.