लस पुरवठ्यालाच सॉफ्टवेअरचा संसर्ग

पुणे – करोना प्रतिबंधक लस पुरवठा आणि साठा याची नोंद ठेवणाऱ्या राज्यसरकारच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे चुकीच्या नोंदी होत असल्याने महापालिकेच्या लसीकरण मोहिमेला त्याचा फटका बसत आहे. लसीकरण थांबवावे लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

लसींच्या अपडेटसाठी राज्य सरकारचे “इ-विन’ सॉफ्टवेअर आहे. त्यामध्ये लस वापराचे अपडेट भरावे लागतात. मात्र त्यात अडथळे आल्याने हे आकडे अपडेट करता आले नाहेत, त्यामुळे पालिकेकडे लसींचा मुबलक साठा शिल्लक असल्याचीच जुनी नोंद त्यात दिसते. यामुळे पालिकेने केलेली लसींची मागणी पूर्ण होत नाही.

पालिकेने राज्य सरकारकडे लसींच्या तीन लाख डोसची मागणी केली होती. त्यातील 90 हजार डोस शुक्रवारी मिळणार होते, मात्र सॉफ्टवेअरच्या या घोळामुळे ते मिळाले नाहीत. परिणामी पुणे महापालिकेला पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उसन्या घेतलेल्या 15 हजार लसींवरच दोन दिवसांचे लसीकरण सुरू ठेवावे लागणार आहे.

महापालिकेकडे सध्या केवळ 14 हजार डोस उपलब्ध आहेत. त्यात खासगी आणि महापालिकेच्या 85 लसीकरण केंद्राचे “टार्गेट’ पूर्ण करता येणार नाही. खासगी रुग्णालयांनी लसीकरणासाठी हजारो रुपये दिले आणि रोजच्या हजार लसी देण्याचे “टार्गेट’ ठेवले असले तरी त्यांनाही केवळ “लिमिटेड’च डोस पुरवावे लागणार आहेत.

राज्य सरकारकडील लस पुरवठा यंत्रणेतील नोंदी दुरुस्त झाल्यावर त्वरित महापालिकेला तीन लाख मागण्यांपैकी किमान 90 हजार डोस मिळतील. महापालिकेकडून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा चालू आहे. ही समस्या संपुष्टात आल्यानंतर लसीकरण व्यवस्था सुरळीत होईल.
– डॉ. आशिष भारती, महापालिका आरोग्य प्रमुख

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.