भोर -तालुक्यातील आज (दि. 6) भोर शहर 1, तांबाड 3, वडगांव 1, भोलावडे 4, कुसगाव 1, उत्रौली 1 व नसरापूर येथील 1 अशा 12 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 241वर पोहचली असून यातील 165 जणांनी आजारावर मात केली आहे. 75 रुग्णांवर भोर, नसरापूर व पुणे येथे उपचार सुरु असल्याची माहिती भोर तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल तनपुरे व तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी दिली.
दरम्यान, दि. 4 व 5 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, सदस्य विठ्ठल आवाळे, सदस्या शलाका कोंडे यांच्या उपस्थितीत सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांच्यासमवेत शिवापूर (वरवे) येथील शिवराय मंगल कार्यालय, शिवमंगल कार्यालय पांडे व भोर तालुका पंचायत समितीच्या सभागृहात बैठका घेतल्या. करोनाला रोखण्यासाठी गावपातळीवर ग्रामसमित्या तयार करून नागरिकांना मार्गदर्शक सूचना देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली.
गावांतून बाहेर ये-जा करणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी रणजीत शिवतरे व विठ्ठल आवाळे यांनी यावर्षी येणारा गणेशोत्सवाचा खर्च करोनाला रोखण्यासाठी व तालुक्यातील ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी करावा, असे आवाहन सरपंच ग्रामस्थांना केले.
गाव पातळीवर करोनाला प्रतिबंध करण्यासाठी ग्रामस्तरीय समिती नेमून प्रत्येकाने जबाबदारी विभागून घेऊन त्याप्रमाणे अंमलात आणण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. गावपातळीवर 60 किंवा अधिक याच्या लोकांची विशेष काळजी घेऊन त्यांना काही आजार असल्यास औषधांची मदत करावी. नागरिकांना नियमांचे पालन करण्याची सक्ती करावी, अशा सूचना सरपंच ग्रामसेवक व विस्ताराधिकाऱ्यांना गट विकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिल्या.