“करोना’ एप्रिलमध्ये 4 तर जुलैमध्ये 21 टक्के संशयितांना लागण
पिंपरी – “करोना’चे रुग्ण सर्वत्रच वाढत आहेत, परंतु पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाचा संसर्ग दर वाढत आहे. गेल्या चार महिन्यात संसर्ग दर पाच पटीने वाढला असल्याचे आकड्यांवरुन दिसून येत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला संशयित म्हणून घेण्यात आलेल्या चाचण्यांपैकी केवळ 4.31 टक्के नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह येत होते. परंतु जुलै अखेरीस हे प्रमाण आता 21 टक्क्यांच्या जवळ जाऊन पोहोचले आहे.
11 मार्च रोजी “करोना’ने पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश केला. त्यावेळी करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या बहुतेक सर्वांचीच चाचणी घेण्यावर प्रशासनाने भर दिला होता. परंतु हाय रिस्क कॉन्टक्टमध्ये आलेल्या अनेकांचे रिपोर्ट निगेटिव्ह येत होते. परंतु कालांतराने करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढू लागले.
राज्यात ऍनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यासाठी राज्याला रेड झोन आणि नॉन रेड झोन अशा दोन भागांमध्ये विभाजित करण्यात आले. त्यावेळी रुग्णसंख्या अधिक असूनही “करोना’ संसर्ग दर अर्थात एकूण झालेल्या चाचण्या आणि त्यातून पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण पाहता पिंपरी-चिंचवड शहराची वर्णी नॉन रेड झोनमध्ये लागली आणि शहर अनलॉक होऊ लागले. परंतु हळू-हळू “करोना’ने पाय पसरण्यास सुरुवात केली. दर पंधरा दिवसांनी पॉझिटिव्ह येण्याची टक्केवारी चार ते पाच टक्क्यांनी वाढू लागली.
मिळाले पोषक वातावरण
सुरुवातीच्या लॉकडाऊनमध्ये पोलीस, प्रशासनाने चांगलीच सख्ती दाखविली. नागरिकांकडूनही सहकार्य मिळाल्याने शहरातील रस्ते सुनसान होते आणि यामुळे संसर्ग दरही आटोक्यात होता. परंतु अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी दारु विक्रीला परवानगी मिळाली आणि “करोना’ला पाय पसरण्यासाठी पोषक वातावरण मिळाले. एप्रिलच्या सुरुवातीला संसर्ग दर 4.31 टक्के होता, तो कडक लॉकडाऊनमुळे कमी होऊन एक मे पर्यंत 4.04 टक्क्यांपर्यत खाली आला होता. त्यानंतर “करोना’ने संथगतीने वेग वाढविण्यास सुरुवात केली. पुढील पंधरा दिवसात संसर्ग दरात किंचित वाढ झाली आणि संसर्ग होण्याची टक्केवारी 4.18 टक्क्यांवर पोहोचली. परंतु त्यानंतर झालेल्या काही निर्णयांनी “करोना’ला पोषक वातावरणाची निर्मिती करुन दिली. पुढील पंधराच दिवसात करोनावाढीचा वेग दुप्पट झाला. 1 जून रोजीपर्यंत एकूण घेण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 8.36 टक्के नागरिकांना लागण झाल्याचे निदर्शनास आले. हा वेग पुढे वाढतच राहिला.
जून-जुलैमध्ये वाढला वेग
15 जून रोजी पहिल्यांदा संसर्ग दर दोन आकड्यात पोहचला. करोनाचा संसर्ग दर सुमारे अकरा टक्क्यांपर्यंत जाऊन पोहचला. पुढील दीड महिन्यात “करोना’ने आपली व्याप्ती वाढविली आणि जास्तीत जास्त लोकांना बाधित करण्यास सुरुवात केली. 29 जुलै अखेरपर्यंत आतापर्यंत घेण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 20.93 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.