#INDvWI : ‘रोहित-राहुल-विराट’चा झंझावत; वेस्टइंडिजसमोर २४१ धावांचे आव्हान

मुंबई : सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहलीच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने तिस-या व निर्णायक टी-२० सामन्यात वेस्टइंडिजसमोर २४१ धावाचे मोठ आव्हान उभ केलं आहे. दोन्ही संघाची मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली असून आजचा सामना मालिका जिंकण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे.

कर्णधार कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारली. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहूल यांनी तूफान फटकेबाजी करत पहिल्या विकेटसाठी ११.४ षटकांत १३५ धावा जोडल्या. केसरिक विलियम्सने रोहित शर्माला झेलबाद करत ही जोडी फोडली. रोहितने ३४ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारासह ७१ धावा केल्या. त्यापूर्वी रोहितने तिस-या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार ठोकत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ४०० षटकार पूर्ण केले.

तिस-या क्रमांकावर फलंदाजीस आलेला रिषभ पंत पुन्हा अपयशी ठरला, तो शून्यावर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि राहुलने सामन्याची सूत्रे हाती घेत आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी तिस-या विकेटसाठी ९५ धावा जोडत संघाची धावसंख्या २०० पार नेली. त्यानंतर शेल्डन काॅटरेलने राहुलला बाद करत ही जोडी फोडली. राहुलच शतक ९ धावांने हुकले, त्याने ५६ चेंडूत ९ चौकार व ४ षटकारासह ९१ धावा केल्या. तर विराटने २९ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारासह ७० धावा करत संघाची धावसंख्या २० षटकांत २४० पर्यत नेली. वेस्टइंडिजकडून गोलंदाजीत ख्यारी पिएरे, जेसन होल्डर आणि शेल्डन काॅटरेल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

Leave A Reply

Your email address will not be published.