#INDvWI : विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का

मुंबई : टी-२० मालिका आटोपल्यावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. मात्र या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला दुखापतीमुळे संघाबाहेर जावे लागले आहे. आता भुवनेश्वरच्या अनुपस्थितीत मुंबईच्या शार्दुल ठाकूरचा एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने याबदल शनिवारी अधिकृत ट्विटर खात्यावरून माहिती दिली आहे.

भुवनेश्वर कुमारला बुधवारी विंडीजविरूध्दच्या टी-२० सामन्यादरम्यान दुखापत झाली होती, त्यामुळे एकदिवसीय मालिकेस त्याला मुकावे लागणार आहे. वेस्टइंडिजविरूध्दच्या पहिल्या दोन टी-२० लढतीत त्याला विकेट घेण्यात अपयश आले होते, मात्र तिस-या सामन्यात ४ षटकात ४१ धावा देत त्याने २ विकेट घेतल्या होत्या.

विश्वचषक स्पर्धेदरम्यान भुवनेश्वर कुमारला दुखापत झाली होती. ४ महिन्यांची विश्रांती आणि उपचारांनंतर भुवीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केले होते. परंतु त्याची दुखापत अजूनही पूर्णपणे बरी झाली नसल्याचं बातमी समोर आली आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिस-या टी-२० सामन्यात भुवीच्या दुखापतीने पुन्हा डोकं वर काढल्याचं पाहायला मिळालं. परिणामी त्याला विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.

भारत-विंडीज एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १५ डिसेंबरला चेन्नईमध्ये खेळला जाणार आहे. दुसरा सामना १८ डिसेंबरला विशाखापट्टणम येथे तर तिसरा सामना २२ डिसेंबरला कटक येथे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.