अहमदाबाद – भारत व वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने आपल्या नावावर एक अनोखी कामगिरी नोंदवली आहे.
विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने 83 चेंडूत 64 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघ 237 धावांपर्यंत मजल मारू शकला. या खेळीसह सूर्यकुमार यादवने एकदिवसीय सामन्यांत पदार्पण केल्यापासून आजवर खेळलेल्या 6 सामन्यात 30 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याचा विश्वविक्रम साकार केला आहे. यापूर्वी अशी कामगिरी इंग्लंडचा ज्यो रूट, पाकिस्तानचा फखर झमान, टॉम कूपर व रायन टेन डॉइत्शे यांनी केली आहे.
सूर्यकुमारने 2021 सालच्या जुलै महिन्यात एकदिवसीय सामन्यांत पदार्पण केले होते. पहिल्या सामन्यात त्याने नाबाद 31 धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने 53, 40, 39 आणि नाबाद 34 धावांची खेळी केली. वेस्ट इंडीज विरुद्धच्या अर्धशतकासह त्याने खास विक्रम आपल्या नावे केला.