पार्ल : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय बोलंड पार्क, पार्ल येथे पार पडला. या सामन्यात यजमानांनी भारताचा 7 गडी राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. नाणेफेक
जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 50 षटकांत 7 गडी गमावून 287 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 48.1 षटकांत केवळ 3 गडी गमावून लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक (78 धावा) याला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
या दुसर्या एकदिवसीय सामन्यादरम्यान झालेल्या प्रमुख विक्रमांवर या लेखातून नजर टाकणार आहोत…
1) ऋषभ पंतने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 85 धावा करून त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली. याचबरोबर पंत दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा करणारा यष्टीरक्षक ठरला. यापूर्वी हा विक्रम राहुल द्रविडच्या नावे होता. द्रविडने 2001 मध्ये डरबन येथे 77 धावा केल्या होत्या.
2) पार्ल येथे खेळल्या गेलेल्या 15 एकदिवसीय सामन्यांमध्ये, दक्षिण आफ्रिकेने सर्वाधिक 288 धावांचा यशस्वी पाठलाग केला. यापूर्वी 2001 मध्ये त्यांनी श्रीलंकेविरुद्ध 250 धावांचे आव्हान पूर्ण केले होते.
3) या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील तिसर्या सर्वोच्च (288 धवा) लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.
4) आशिया खंडाबाहेर भारतीय संघाचा हा सलग तिसरा एकदिवसीय मालिका पराभव आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
5) भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलग 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकही बळी घेता आलेला नाही. या कालावधीत त्याने एकूण 32 षटके टाकली आहेत.
6) केएल राहुल त्याच्या कर्णधार कारकिर्दीतील पहिल्या 2 एकदिवसीय सामन्यांत पराभूत होणारा भारताचा 5वा कर्णधार ठरला. यापूर्वी अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर, क्रिस श्रीकांत आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी कर्णधार म्हणून पहिले दोन एकदिवसीय सामने गमावले होते.
7) दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7व्यांदा 50 पेक्षा अधिक धावा केल्या. यापूर्वी त्याने भारताविरुद्ध 5 शतके आणि एक अर्धशतक झळकावले होते.
8) या सामन्यात विराट कोहली खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. तो त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 14व्यांदा शून्यावर बाद झाला. यासह प्रथमच एका फिरकीपटूने त्याला शून्यावर बाद केले.
9) जनेमन मलान हा त्याच्या 12व्या डावात सर्वात जलद 700 एकदिवसीय धावा करणारा खेळाडू ठरला. टॉम कूपरने यापूर्वी 13 डावात सर्वाधिक 700 धावा केल्या होत्या.
10) डी कॉक आणि जेनेमन मलान यांनी 2006 पासून भारताविरुद्ध धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघासाठी पहिली शतकी सलामी भागीदारी केली. यापूर्वी 2006 मध्ये सेंच्युरियन येथे एबी डिव्हिलियर्स आणि ग्रॅमी स्मिथ यांनी 173 धावा जोडल्या होत्या.