बेंगळुरू – पहिला डाव 252 धावांवर संपल्यानंतर भारतीय संघाने श्रीलंकेला पहिल्या डावात अवघ्या 109 धावांत गुंडाळले. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने घेतलेल्या पाच बळींच्या जोरावर भारतीय संघाने हा सामनाही पाच दिवसांच्या आत जिंकण्याचे चित्र उभे केले. पहिल्या डावात 143 धावांची मोठी आघाडी घेतलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी आपला दुसरा डाव 9 बाद 303 धावांवर घोषित केला व एकूण आघाडी 446 धावांची मिळवली.
रविवारी खेळ थांबला तेव्हा श्रीलंका संघाने आपल्या दुसऱ्या डावात 1 बाद 28 धावा केल्या असून ते अद्याप 419 धावांनी पिछाडीवर आहेत. या कसोटीतही यजमान भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर असून हा सामना जिंकल्यास श्रीलंकेचा व्हाईटवॉशची नामुष्की पत्करावी लागेल.
– भारत पहिला डाव 252
– श्रीलंका पहिला डाव 109
– भारत दुसरा डाव 9 बाद 303 घोषित
– एकूण 446 धावांची आघाडी
– श्रीलंका अद्याप 419 धावांनी पिछाडीवर
– अय्यर व पंतची अर्धशतके
– भारताकडे मोठी आघाडी
– श्रीलंका व्हाइटवॉशच्या सावटात
– रोहितच्या षटकारामुळे चाहता जखमी
– अर्धशतक हुकले
– विराट कोहलीची पुन्हा एकदा निराशा
– बुमराहचे पाच बळी
– गुलाबी चेंडूचा स्विंग श्रीलंकेसाठी मारक
– दिवसभरात 15 बळी
शनिवारच्या 6 बाद 86 धावांवरून पुढे खेळ सुरू झाल्यावर श्रीलंकेच्या उर्वरीत फलंदाजांना बुमराह आणि कंपनीसमोर खेळपट्टीवर तगही धरता आला नाही. अँडेलो मॅथ्युज 43, निरोशन डीकवेला 21 व धनंजय डिसील्व्हा 10 यांनाच दोनअंकी धावा करता आल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 5 गडी बाद केले. रवीचंद्रन अश्विन व महंमद शमी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. अक्सर पटेलने 1 बळी मिळवला.
भारताने आपला दुसरा डाव सुरु केल्यावर सलामीवीर मयंक आग्रवालने सुरुवात चांगली केली मात्र, तो 22 धावा काढून परतला. कर्णधार रोहित शर्मा देखील पुन्हा एकदा अर्धशतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला व 46 धावांवर बाद झाला. माजी कर्णधार विराट कोहली याने पुन्हा एकदा निराशा केली. तो 13 धावांवर बाद झाल्यावर हनुमा विहारीही 35 धावा काढून परतला. त्यानंतर ऋषभ पंतने आक्रमक अर्धशतकी खेळी केली. तो 31 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 50 धावा काढून बाद झाल्यावर श्रेयस अय्यर पुन्हा एखदा संकटमोचक ठरला. त्याने 87 चेंडूत 9 चौकारांसह 67 धावांची खेळी करताना संघाला अडीचशे धावांच्या पुढे मजल मारून दिली.
त्यानंतर रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन व महंमद शमी यांनी थोडीफार चमक दाखवली व संघाला त्रिशतकी धावा उभारुन दिल्या. भारताने आपला दुसरा डाव 9 बाद 303 धावांवर घोषित करत श्रीलंकेसमोर विजयासाठी 447 धावा करण्याचे आव्हान ठेवले. श्रीलंकेकडून प्रवीण जयविक्रमाने 4 गडी बाद केले. लसित एम्बुलडेनियाने 3 गडी बाद केले. धनंजय डीसिल्व्हा व विश्व फर्नांडो यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
श्रीलंकेची दुसऱ्या डावाची सुरुवातही निराशाजनक झाली. खातेही उघडलेले नसताना सलामीवीर लाहिरू थिरीमने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर मात्र, दिवसातील उर्वरित खेळात कुशल मेंडीसने नाबाद 16 तर, दीमुथ करुणारत्नेने नाबाद 10 धावा करत संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही. श्रीलंका अद्याप 419 धावांनी पिछाडीवर आहे.
संक्षिप्त धावफलक –
भारत पहिला डाव – 252, श्रीलंका पहिला डाव – 35.5 षटकांत सर्वबाद 109 धावा. (अँडेलो मॅथ्युज 43, निरोशन डीकवेला 21, धनंजय डिसील्व्हा 10, जसप्रीत बुमराह 5-24, महंमद शमी 2-18, रवीचंद्रन अश्विन 2-30, अक्सर पटेल1-21). भारत दुसरा डाव – 68.5 षटकांत 9 बाद 303 घोषित. (श्रेयस अय्यर 67, ऋषभ पंत 50, रोहित शर्मा 46, हनुमा विहारी 35, मयंक आग्रवाल 22, रवींद्र जडेजा 22, प्रवीण जयविक्रमा 4-78, लसित एम्बुलडेनिया 3-87). श्रीलंका दुसरा डाव – 7 षटकांत 1 बाद 28 धावा. (कुशल मेंडीस खेळत आहे 16, दीमुथ करुणारत्ने खेळत आहे 10, जसप्रीत बुमराह 1-9).