बेंगळुरू – भारत आणि श्रीलंका यांच्यात येथे झालेल्या प्रकाशझोतातील कसोटी सामन्यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी सुमार दर्जाची होती, असा परखड शेरा भारताचे माजी कसोटीपटू व आयसीसीचे सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी मारला आहे. भारताने ही कसोटीही जिंकून मालिकेत श्रीलंकेला व्हाइटवॉश दिला होता.
श्रीनाथ यांनी दिलेल्या दणक्यानंतर भारतीय संघाच्या विजयाला टीकेचे स्वरूप आले आहे. श्रीनाथ यांच्या मताला आयसीसीनेही गांभीर्याने घेतले असून, आता पाकिस्तान क्रिकेट मंडळापाठोपाठ बीसीसीआयवरही ताशेरे ओढले आहेत. प्रत्येक देश मायदेशात होत असलेल्या सामन्यासाठी आपल्या संघाची ताकद ओळखून खेळपट्टी तयार करतो. याला इंग्लंड व ऑस्ट्रेलियासह कोणताही देश अपवाद नाही. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयार केलेली खेळपट्टी दर्जाहीन असल्याचे सांगितल्यामुळे भारतीय संघाचाच माजी कसोटीपटू असलेल्या श्रीनाथ यांच्यावर बीसीसीआय काय भूमिका घेते, याकडेही लक्ष लागले आहे. या खेळपट्टीला आयसीसीच्या खेळपट्टी व आउटफिल्ड समीक्षण समितीने एक डीमेरिट पॉंइंट दिला आहे. त्यामुळे आता भविष्यात या खेळपट्टीवर पुन्हा डीमेरिट गुण दिले गेले तर या मैदानावर होत असलेले सामने रद्द केले जाण्याचाही धोका आहे. तसेच बीसीसीआयला येत्या काळात आपल्या खेळपट्टी निरीक्षण व निर्मिती समितीकडून या खेळपट्टीत सुधारण घडवावी लागेल.
भारतीय संघाने येथे झालेल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा 238 धावांनी पराभव केला होता. हा सामना पाच दिवसांचा असूनही अवघ्या तीन दिवसांतच संपला होता. त्यानंतरच या खेळपट्टीवर टीका होऊ लागली होती. या सामन्यात रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह यांनी श्रीलंकेच्या फलंदाजीची वाताहत केली होती.
श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने एकाकी झुंज दिली होती. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 14 वे कसोटी शतक फटकावले होते. मात्र, तरीही तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. यापूर्वी भारतीय संघाने मोहालीत झालेल्या कसोटीत श्रीलंकेचा एक डाव आणि 222 धावांनी पराभव केला होता.
बीसीसीआयच्या चिंतेत भर
आयसीसीने शेरा मारल्यामुळे आता बीसीसीआयच्या चिंतेत भर पडली आहे. मुळातच आशिया खंडातील खेळपट्टी फलंदाजी व फिरकी गोलंदाजीला मदत करणारी ठरते. त्यामुळे आजवर ऑस्ट्रेलियासह अनेक परदेशी संघांनी यापूर्वीही अनेकदा बीसीसीआयवर टीका केली आहे. आपल्याच देशात होत असलेल्या सामन्यांबाबत प्रत्येक देश सावध असतो व आपली ताकद फलंदाजी व गोलंदाजी यांपैकी कशात जास्त आहे ते पाहून खेळपट्टी तयार केली जाते. मात्र, आता येत्या काळात भारतात होणाऱ्या कसोटी मालिकांबाबत आयसीसी आपला निरीक्षक पाठवणार का व बीसीसीआय याबाबत कोणती भूमिका घेणार, याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होणार आहे.
पाकबाबतही आयसीसी नाराज
ऑस्ट्रेलियाचा संघ तब्बल दोन दशकांनंतर पाकिस्तानात कसोटी मालिका खेळण्यासाठी दाखल झाला. या दोन संघात झालेल्या रावळपिंडीतील कसोटीत तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवरही आयसीसीने ताशेरे ओढताना नाराजी व्यक्त केली होती. फलंदाज व गोलंदाज यांना समसमान मदत करेल अशी खेळपट्टी तयार करणे आवश्यक असतानाही पाटा खेळपट्टी तयार करण्यात आली होती. त्यावर आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे आपली नाराजी व्यक्त करताना त्यांच्या रावळपिंडी मैदानावरील खेळपट्टीलाही डीमेरिट गुण दिले आहेत.