बेंगळुरू – रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आजपासून श्रीलंकेविरुद्ध दुसरी कसोटी खेळणार आहे. ही कसोटी दिवस-रात्र गुलाबी चेंडूवर प्रकाशझोतात खेळवली जाणार आहे. या कसोटीत भारत व श्रीलंका संघातील नवोदित खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष राहणार आहे.
मोहालीतील पहिली कसोटी एक डाव 222 धावांनी जिंकत भारताने मोठ्या विजयासह या दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी भक्कम आघाडी घेतली आहे. आता या कसोटीसह मालिकाही जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज बनला आहे. दुसरीकडे श्रीलंकेचा संघही संघबांधणीच्या प्रक्रीयेतून जात आहे. आगामी काळात दोन्ही संघांना अनेक महत्वाच्या मालिका खेळायच्या आहेत, त्यामुळे या संघातील नवोदित खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे लक्ष राहणार आहे.
भारतीय संघाबाबत बोलायचो झाले तर प्रमुख खेळाडूंसह नवोदितांनाही संधी मिळण्याचे संकेत रोहितने दिले आहेत. शुभमन गिल, महंमद सिराज यांच्यासह प्रियांक पांचाळ, श्रीकर भरत व सौरभ कुमार यांनाही संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज अक्सर पटेल यालाही अंतिम संघात स्थान मिळण्याची शक्यता वाढली असून जयंत यादवला वगळले जाइल. फलंदाजीत कर्णधार रोहित शर्मा व माजी कर्णधार विराट कोहली यांच्यावर मोठ्या खेळीचे दडपण राहणार आहे.
दुसरीकडे श्रीलंकेचा संघ पाहता दासून शनाका व दीमुथ करुणारत्ने यांच्यापैकी या कसोटीत कोण नेतृत्व करणार याकडे लाक्ष राहणार आहे. तसेच पाथुम निसांका, चरिता असालंका, विश्व फर्नांडो व लाहिरू कुमारा यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची चांगली संधी आहे. प्रमुख खेळाडूंनी श्रीलंका क्रिकेट मंडळाशी वाद झाल्यावर अनेक मालिकांप्रमाणे या मालिकेतूनही माघार घेतली असल्याने नवोदितांना संघातील आपले स्थान बळकट करण्याची नामी संधी आहे.
फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व नेतृत्व या सर्वच क्षेत्रात भारतीय संघ जास्त सरस असल्याने त्यांचेच पारडे याही कसोटीत जड राहणार आहे. आता ही प्रकाशझोतातील कसोटी जिंकून ही मालिकाही 2-0 अशी निर्विवादपणे खिशात घालण्यासाठी भारतीय संघ सज्ज बनला आहे.